
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात वाढत आहे. तसेच हिंदुस्थानसह जगातील 15 मोठ्या अर्थव्यवस्थांना कोरोनाचा फटका बसला आहे. देशातील 4 सेक्टर मोठ्या अडचणीत सापडले आहेत. तसेच अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा परिणाम दिसत असल्याने मूडीजने जागतिक आर्थिक विकासाच्या दरात कपात केली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे बाजार, मॉल ओस पडले आहेत. अनेकांनी आपले परदेश दौरे रद्द केले आहेत. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले आहे.
चीनमधून पसरलेला व्हायरस जगभरातील 100 देशांमध्ये झपाट्याने फैलावत आहे. कोरोनाचा फटका 15 मोठ्या अर्थव्यवस्थांना बसला आहे. त्यात हिंदुस्थानचाही समावेश आहे. हिंदुस्थानच्या व्यापारसाखळीचा थेट संबंध चीनशी असल्याने त्याचे परिणाम दिसत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला 34.8 कोटी डॉलरचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. युरोपच्या आर्थिक सहयोग आणि विकास संघटनेने 2020-21 या वर्षातील हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेचा अंदाजित दर 1.1 टक्क्याने घटवला आहे. हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेचा विकासदर 6.2 टक्के राहील, असा अंदाज वर्तवला होता. आता तो दर 5.1 असा करण्यात आला आहे. मूडीजच्या नवीन अंदाजानुसार 2020 या वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 1.9 टक्के दराने विकास करेल. याआधी जानेवारीत मूडीजने हा दर 2.6 टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
चीन, हाँगकाँग यासारख्या देशांच्या बाजारपेठा ठप्प असल्याने ज्वेलरी उद्योगाचे 1.25 अब्ज डॉलरचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्वेलरी सेक्टरच्या नुकसानामुळे या क्षेत्राशी संबिधत उद्योगही संकटात सापडले आहेत. चीनहून कच्च्या मालाचा पुरवठा थांबल्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्राचे नुकसान होत आहे. कच्च्या मालाचा पुरवठाच होत नसल्याने या सेक्टरचे काम ठप्प होण्याची भीती आहे. या क्षेत्राला लागणाऱ्या सुट्या भागांपैकी 27 टक्के आयात चीनकडून करण्यात येते. जागतिक मंदीच्या सावटामुळे या वर्षात वाहनांची मागणी 8.3 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे. बाजरपेठा, मॉल, सिनेमाघरे बंद असल्याने रियल इस्टेट क्षेत्रालाही नुकसान होत आहे. जागतिक मंदीमुळे संकटात आलेल्या या क्षेत्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी औषधांची मागणी वाढत आहे. मास्क, सॅनिटायझरसह इतर अत्यावश्यक साहित्याची मागणी वाढत असल्याने मात्र त्या प्रमाणात उत्पादन नसल्याने फार्मा सेक्टरही अडचणीत आले आहे. या क्षेत्रांना आणि हिंदुस्थानसह जागतिक अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या नुकसानीतून सावरण्यासाठी जास्त कालावधी लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.























































