कॉन्स्टेबलकडे उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती, पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असताना गेल्या 18 वर्षांत कॉन्स्टेबलने उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बनविल्याचे समोर आले आहे. या कॉन्स्टेबलने स्वतःपेक्षा पत्नीच्या नावे जास्त संपत्ती जमा केल्याचे उघडकीस आल्याने ऍण्टी करप्शन ब्युरोने दोघा पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रमेश किसन आवटे (40) असे या कॉन्स्टेबलचे तर दीपाली रमेश आवटे (33) असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. पोलीस शिपाई असलेला रमेश नायगाव येथे ल विभागात कार्यरत होता. सरकारी नोकरीत असताना रमेश आवटे याने पदाचा दुरुपयोग करून भ्रष्ट मार्गाने ज्ञात उत्पन्नापेक्षा 22 लाख 32 हजार 295 इतकी जास्त संपत्ती जमा केल्याचे समोर आले आहे. शिवाय दीपाली हिने ही संपत्ती जाणीवपूर्वक आपल्या नावे करून पतीला भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमविण्यास प्रोत्साहन दिले. यामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.