गंमत म्हणून डीएनए चाचणी केली, वेगळीच भानगड उघडकीस आली

डोना आणि वन्नेर जॉन्सन हे जोडपं अमेरिकेतील आनंदी जोडप्यांपैकी एक होतं. या दोघांना दोन मुलं असून हे चौकोनी कुटुंब खूप मजेत जगत होतं. या जोडप्याला काय हुक्की आली माहिती नाही, मात्र दोघांनी स्वत:ची आणि धाकट्या मुलाची गंमतीत डीएनए चाचणी करायची ठरवली, आणि इथूनच खरी गडबड सुरू झाली.

डोना आणि वन्नेर जॉन्सन हे अमेरिकेतील उटाह भागात राहतात. या दोघांचा लहान मुलगा हा आता 12 वर्षांचा झाला आहे. या दोघांनी दुसऱ्या मुलासाठी IVF तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं ठरवलं होतं. जेव्हा डीएनए चाचणीचे निकाल आले तेव्हा त्यांना मुलाचा बाप कोण या रकान्यापुढे Unknown म्हणजे माहिती नाही असं लिहिलेलं आढळलं. त्यांना सुरुवातीला ही चूक असावी असं वाटलं होतं, मात्र त्यांनी खोदून-खोदून चौकशी केल्यानंतर ही चूक नसल्याचं त्यांना कळालं. असं कसं झालं हे त्यांना काही केल्या कळत नव्हतं. बराच विचार केल्यानंतर दोघांना काय घडलं त्याची कल्पना आली.

ज्या क्लिनिकमध्ये हे कृत्रिम गर्भधारणेसाठी गेले होते तिथूनच या गडबड प्रकाराला सुरुवात झाली होती. IVF साठी वेन्नरचं वीर्य वापरण्याऐवजी या क्लिनिकने भलत्याच माणसाचं वीर्य वापरलं होतं. अशी चूक कोणी कशी काय करू शकतो? ही चूक झालीच का? असे प्रश्न या जोडप्याने क्लिनिक चालकांना विचारले. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आता या दोघांनी या क्लिनिक विरोधात खटला दाखल करायचं ठरवलं आहे. या दोघांनी इतक्यावर स्वस्थ न बसता मुलाच्या खऱ्या बापालाही शोधून काढलं. ही व्यक्ती आणि त्याची बायकोही या क्लिनिकला कोर्टात खेचणार आहे. ज्या दिवशी डोना आणि वन्नेर क्लिनिकमध्ये गेले होते, त्याच दिवशी त्यांच्या धाकट्या मुलाचा खरा बापही क्लिनिकमध्ये आला होता. क्लिनिकने त्याच्या आणि वन्नेरच्या वीर्यामध्ये गल्लत केली, ज्यामुळे हा सगळा घोळ झाला.

आपली प्रतिक्रिया द्या