
हिंदुस्थानात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. अशातच एक शुभवार्ता आली आहे. खुद्द अमेरिकन तज्ञांनीच ती दिली आहे. हिंदुस्थानात बनवण्यात आलेली कोव्हॅक्सिन ही लस कोरोनाच्या 617 प्रकारच्या विषाणूंवर प्रभावी ठरणार असल्याचे अमेरिकेतील संसर्गजन्य विकार तज्ञ डॉ. अॅन्थनी फॉसी यांनी म्हटले आहे.
डॉ. फॉसी हे अमेरिकन सरकारचे वैद्यकीय सल्लागार आहेत. प्रसारमाध्यमांनी नुकताच त्यांच्याशी संवाद साधला. जगभरातील लसीकरण आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱया लसींबाबत दररोज नवीन माहिती उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुस्थानातील लसीकरणाबद्दलची माहितीही आपल्याला मिळाली आहे. त्या माहितीचे आम्ही विश्लेषण केले. त्यातून असा निष्कर्ष निघाला की हिंदुस्थानात लसीकरणासाठी वापरण्यात येणारी भारत बायोटेक निर्मितीत कोव्हॅक्सिन ही लस कोरोनाच्या 617 प्रकारच्या विषाणूंना निकामी करण्यास सक्षम आहे असे डॉ. फॉसी यांनी सांगितले.
लसीकरणानंतर हिंदुस्थानातील परिस्थिती नियंत्रणात येणार
हिंदुस्थानात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी लसीकरणावरही भर देण्यात आला आहे. लसीकरणानंतर नागरिकांमध्ये कोरोना प्रतिकारक शक्ती मोठया प्रमाणावर निर्माण होईल आणि परिस्थिती नियंत्रणात येईल असा विश्वास डॉ. फॉसी यांनी व्यक्त केला.




























































