
आरोग्य व्यवस्था बळकट करतानाच, सामूहिक प्रयत्नातून कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या यशाचा डंका देशभरात वाजला. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्मार्ट सिटी अॅवार्ड स्पर्धेत कल्याण डोंबिवली महापालिकेने पहिला नंबर पटकावला. देशभरातील शंभर शहरांमधून कल्याण डोंबिवली महापालिकेची निवड करण्यात आली. कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेऊन ’कोविड इन्होवेशन पुरस्कार’ने कल्याण-डोंबिवलीसह वाराणसी पालिकेचा गौरव करण्यात आला.
केंद्र सरकारने 25 ऑगस्ट 2020 रोजी देशभरातील 100 स्मार्ट सिटींसाठी विविध प्रकारांमध्ये ऑनलाईन पद्धतीने स्मार्ट सिटी अॅवार्ड स्पर्धा घेतली. या स्पर्धेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. त्याचप्रमाणे कोविड काळात सर्व महानगरांनी केलेल्या कामाबाबत ’कोविड इन्होवेशन पुरस्कार’ हा एक विशेष पुरस्कारानेही गौरविण्यात येणार होते. या पुरस्कारासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आपले सादरीकरण पाठविले होते. कोविड इन्होवेशन अॅवॉर्डसाठी अंतिम फेरीत फक्त वाराणसी, कल्याण डोंबिवली, वडोदरा आणि आग्रा या चार शहरांची निवड झाली होती. आज केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाच्या राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या स्पर्धेचा निकाल घोषित केला. त्यात कल्याण-डेंबिवली महापालिका आणि वाराणसी पालिकेला संयुक्तपणे प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले.
याची घेतली दखल
ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा झाली. कल्याण–डोंबिवली महापालिकेने कोरोना नियंत्रण, प्रशासकीय कामकाज, सांघिक भावनेने संकटाचा केलेला मुकाबला, शहराने जोपासलेली संस्कृती याची केंद्र शासनाने दखल घेऊन पुरस्कार जाहीर केला.
हा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचा विजय
हा पुरस्कार म्हणजे कल्याण-डोंबिवलीकरांचा सन्मान आहे. कोविड काळात महापालिकेला मदत करणारे सर्व आरोग्य कर्मचारी, असंख्य डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस, आरोग्य विभाग तसेच पालिकेचे सर्व कर्मचारी, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या सामूहिक प्रयत्नांचा विजय आहे. यापुढेही आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी निश्चितपणे भरीव कामगिरी करून दाखवू.
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त































































