मैं हूँ ना’ रेमडिसिव्हीरपेक्षा अधिक प्रभावी… कोरोना योद्ध्याने व्यक्त केली भावना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये कर्तव्य बजावत असताना दीपक भोसले या तरुण पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली. अचानक प्रकृती खूपच गंभीर झाल्याने नातेवाईकांची धावपळ सुरु झाली. दुसऱ्याच्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या कोरोना योद्ध्याला उपचारासाठी बेड मिळेना.

कुठेच बेड शिल्लक नसल्याने, दिपक आणि त्यांचे नातेवाईक हताश झाले. वेळेवर उपचार मिळाले नाहीतर आपले काही खरे नाही या भीतीने दिपकही गर्भगळीत झालेला असताना, पंढरपूरचे डीवायएसपी विक्रम कदम हे दिपकच्या मदतीसाठी देवदूताप्रमाणे धावून आले. त्यांनी तातडीने एका खाजगी हॉस्पिटलमध्ये बेडची व्यवस्था करुन उपचार सुरु केले. घाबरु नकोस दीपक ‘मैं हूँ ना’ कुछ नहीं होगा असा मायेचा आधार दिला. कदम यांच्या या आपुलकीच्या शब्दांनी बाराहत्तीचे बळ मिळालेल्या दीपकने कोरोनावर मात केली. रुग्णालयामधून बाहेर पडताच त्याने भरल्या डोळ्यांनी हात जोडून कदम यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. साहेब, रेमडिसिव्हीरपेक्षा तुमच्या ‘मैं हूँ ना’ या एका वाक्याने मी मृत्यूवर विजय मिळविला असल्याची भावना दिपकने व्यक्त केली. तेंव्हा उपस्थित सर्वांचे डोळे आनंद अश्रूंनी डबडबले.

कोरोना महामारीच्या लढ्यात वैद्यकीय सेवा, पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग हे आघाडीवर आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ही मंडळी अहोरात्र रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी धडपडत आहेत. या धावपळीत कितीही काळजी घेतली तरी अनेकांना कोरोनाने गाठले आहे. पोलीस दलातील दोनशेहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे.

एवढ्या मोठ्याप्रमाणात प्राणहानी होऊन देखील पोलीस दल कोरोनाच्या काळात कायदा व सुव्यवस्था आणि गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चोवीस तास रस्त्यांवर कार्यरत आहे. कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झाली तर तातडीने वैद्यकीय सेवा मिळण्याची हमी नसताना जीव धोक्यात घालून पोलीस दादा आपले कर्तव्य बजावतो आहे. पोलिसांची ही डावी बाजू लक्षात घेऊन सोलापूरच्या एसपी तेजस्विनी सातपुते, सहाय्यक एसपी अतुल झेंडे यांनी पंढरपूर आणि सोलापूर येथे खास पोलीस कर्मचाऱ्यांसाठी कोविड सेंटर उभारली आहेत.

ही कोविड सेंटर पोलीस कर्मचाऱ्यांना मानसिक दिलासा देणारी असली तरी व्हेंटिलेटर व इतर अत्यावश्यक सेवा उपलब्ध नसल्याने अतिगंभीर रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागते. सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय असून सरकारी आणि खाजगी रुग्णालये हाऊसफुल्ल आहेत. बेडच उपलब्ध नसल्याने रुग्णांना सांगली, कोल्हापूर अन पुणे जिल्ह्यात हलवावे लागत आहे.

अशा सगळ्या आणीबाणीच्या परिस्थितीत डीवायएसपी कदम यांनी आपला हुद्दा बाजूला ठेवून आपल्या सहकारी कर्मचाऱ्यासाठी दाखवलेली आत्मीयता, माणुसकी आणि तत्परता ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.