
मुंबईतील मूकबधिर मुलांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात येत आहे. मुंबईत माटुंगा येथे प्रथमच मूकबधिर मुलांसाठी क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हिंदुस्थानचे सुप्रसिद्ध मूकबधिर क्रिकेटपटू शरद पाटणे व दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर संपन्न होणार आहे
शरद पाटणे यापूर्वी हिंदुस्थानी मूकबधिर क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे क्रिकेट खेळलेले आहेत. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान यांच्याविरुद्ध त्यांनी चांगली कामगिरी बजावलेली आहे. निवृत्त झाल्यानंतरसुद्धा त्यांनी महाराष्ट्रात क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. वयाच्या 72 व्या वर्षीसुद्धा ते अजूनही अथक मेहनत घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक मालशे, विनय सानप, इंद्रजीत यादव, श्रीराम घाडगे यांसारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मूकबधिर क्रिकेटपटू तयार झाले आहेत. अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे मुंबईचा हर्षल जाधव मूकबधिर क्रिकेटपटू मुंबईतल्या 20 वर्षांखालील नॉर्मल क्रिकेट संघामध्ये खेळलेला आहे. इतकेच नव्हे तर मूकबधिर क्रिकेटच्या आयपीएलमध्ये त्यांनी लागोपाठ तीन वेळेला उत्कृष्ट कामगिरी करून ‘मॅन ऑफ द सीरिज’ बक्षीस पटकावले आहे.
ज्येष्ठ क्रिकेटपटू शरद पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली माटुंगा मुंबई येथे मूकबधिरांसाठी पहिल्यांदा क्रिकेटचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. शरद पाटणे यांचे स्वप्न आहे की, मुंबईमध्ये मूकबधिर मुलांना क्रिकेटचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू म्हणून तयार करावे व त्यांनी देशासाठी चांगली कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करावे. तरी मुंबईतल्या होतकरू डेफ मुलांना आणि शाळेतील मूकबधिर मुलांनी या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. संपर्क दीपक जाधव (मोबाईल नंबर 7021551692), शरद पाटणे सर (मोबाईल नंबर 9321454343 (फक्त व्हिडीओ कॉल व्हॉट्सअॅपवर).


























































