WTC फायनलसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ खेळाडूंना मिळालं संघात स्थान…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये 18 ते 22 जूनदरम्यान हा मुकाबला रंगणार आहे. या सामन्यासाठी 15 खेळाडूंना टीम इंडियाच्या संघात स्थान मिळालं आहे.

हिंदुस्थानी संघ 25 खेळाडूंसह इंग्लंडला गेला आहे, ज्यात 5 खेळाडू स्टँड बाय आहेत. 15 खेळाडूंच्या हिंदुस्थानी संघात दोन फिरकीपटू, 5 वेगवान गोलंदाज, दोन विकेटकीपर आणि 6 फलंदाज आहेत. यापैकी आता 11 खेळाडू मैदानात उतरवले जाणार आहेत.

संघात स्थान मिळवलेल्या 6 फलंदाजांमध्ये शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी आहेत. तसेच ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव या गोलंदाजांना संघात स्थान मिळालं आहे. याशिवाय आर अश्विन आणि रवींद्र जडेजा हे फिरकीपटूही संघात असणार आहेत. संघात ऋषभ पंत सोबतच ऋद्धिमान साहा यालाही जागा मिळाली आहे.

‘या’ खेळाडूंना संघात नाही मिळाली जागा

इंग्लंडविरुद्ध जबरदस्त गोलंदाजी करणारा डावखुरा फिरकीपटू अजर पटेल, ऑस्ट्रेलियामधील मालिकेतील नायक वॉशिंग्टन सुंदर, सलामीवीर मयंक अग्रवाल, शार्दुल ठाकूर आणि केएल राहुल यांना 15 सदस्यीय संघात स्थान मिळालेले नाही.