
‘तुम्ही गरीब दिसाल म्हणजे ते शेठ तुम्हाला साडी देतील. यासाठी तुमच्या गळ्यातील बोरमाळ काढून द्या,’ असे म्हणताच वृद्धेने बोरमाळ काढून दिली. मात्र, रुमालामध्ये बोरमाळ बांधण्याचे नाटक करीत दोघा भामटय़ांनी बोरमाळ लंपास करून वृद्धेला गंडा घातला. ही घटना राजवाडा परिसरातील सुमित्रा संकुल परिसरात दुपारी साडेबारा वाजता घडली.
सुनंदा उद्धव इंदलकर (वय 70, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) असे वृद्धेचे नाव आहे. इंदलकर या दुपारी राजवाडय़ावर आल्या होत्या. त्यावेळी तेथे दोन तरुण आले. त्यातील एका तरुणाने त्यांच्याशी ओळख वाढविण्याचा प्रयत्न केला. तो तरुण त्यांना म्हणाला, ‘एक दुकानदार आहे. त्याला दहा वर्षांनी मुलगा झाला आहे. त्या बाळाला आशीर्वाद दिला, तर ते शेठ साडी वगैरे दान देतात, पण तुमच्या गळ्यात सोन्याची बोरमाळ आहे. त्यामुळे ते तुम्हाला साडी देणार नाहीत. तुम्ही गरीब दिसायला हवे. यासाठी गळ्यातील बोरमाळ काढा,’ असे त्याने सांगितले.
त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सुनंदा इंदलकर यांनी बोरमाळ काढून त्या तरुणाच्या हातात दिली. त्या तरुणाने हातचलाखी करून माळ लंपास केली. काही वेळानंतर दोघेही तरुण तेथून पसार झाले. बोरमाळ नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
























































