
हिंदुस्थानात गरजू कोविड रुग्णांना मदतीच्या नावाखाली वृद्धाची 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना पवई पोलिसांनी अटक केली. राहुल विनोद तिवारी, असिम शमशाद हुसेन आणि आसिफ वसीम खान अशी त्या तिघांची नावे असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. या टोळीतील मुख्य सूत्रधार हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
तक्रारदार हे पवई येथे राहत असून ते सेवानिवृत्त आहेत. एप्रिल महिन्यात तक्रारदार हे घरी होते तेव्हा त्यांना फेसबुकवर लंडन येथील एका महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनी ती रिक्वेस्ट स्वीकारली. तिने आपण लंडन येथे राहत असून हिंदुस्थानात कोविडच्या स्थितीबाबत फेसबुकवर चॅटिंगदरम्यान चर्चा केली. आपल्याला कोविडची बाधा झालेल्या गरजू रुग्णांना मदत करायची आहे, पण सध्या मी लंडनला असल्याने हिंदुस्थानात येता येणार नाही. त्यामुळे तुमच्या बँक खात्यात एक लाख 30 हजार पौंड पाठवत असल्याच्या भूलथापा मारल्या. बँक खात्यात पाठवलेली रक्कम ही कोविड रुग्णावर खर्च करण्यास सांगितली. त्याला होकार दिल्यावर काही वेळाने तक्रारदारांना एका महिलेचा फोन आला. तिने आपण कस्टम अधिकारी असून त्याच्याकडे एक परदेशातून पार्सल आले असून त्यात परदेशी चलन आणि काही रक्कम आहे.
ती रक्कम सोडवण्यासाठी बँक खात्यांत काही पैसे जमा करावे लागतील असे तक्रारदारांना सांगण्यात आले. त्या महिलेच्या भूलथापांना बळी पडून तक्रारदारांनी बँक खात्यात 20 लाख 40 हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यावर पैसे मागणे सुरूच होते. त्यांना हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त डॉ. एम. व्ही. रेड्डी यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक आबूराव सोनावणे यांच्या पथकातील सहायक निरीक्षक विनोद पाटील आणि पथकाने तपास सुरू केला. पोलिसांना तपासादरम्यान महत्त्वाची माहिती मिळाली. तक्रारदारांना करण्यात आलेले फोन हे दिल्ली, नोएडा आणि उत्तर प्रदेश येथून केल्याचे उघड झाले. त्यानंतर पवई पोलिसांचे पथक नोएडा येथे गेले. नोएडा पोलिसांच्या मदतीने तिघांना ताब्यात घेतले. त्या तिघांकडून पोलिसांनी 16 एटीएम कार्ड, पासबुक, चेकबुक, पाच मोबाईल, आधारकार्ड जप्त केले. फसवणूक करणारी ही टोळी असून त्या टोळीने काही महिलांचा वापर फसवणुकीसाठी केल्याचे तपासात समोर आले आहे. या टोळीने बनावट कागदपत्रे तयार करून बँकेत खाती उघडली होती. त्यासाठी त्यांना काही कमिशन मिळत होते. त्या खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत असायची.




























































