
मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गुह्यांचे प्रमाण वाढले असले तरी आम्ही प्रत्येक तक्रारीची दखल घेतो. गुन्हय़ांची उकल करण्यासाठी आम्ही केलेल्या एकत्रित प्रयत्नांना यश आले असून त्याचे प्रमाण प्रथमच 75 टक्क्यांनी वाढले आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते यांनी आज केले. त्यांनी वर्षभराचा लेखाजोखा मांडतानाच सर्वसामान्य माणसांच्या संरक्षणासाठी पोलीस सदैव तत्पर असल्याचा विश्वासही दिला.
मीरा-भाईंदर-वसई-विरार या नव्या पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने मागील वषांच्या तुलनेत या 2021 या वर्षातील गुन्हे आणि पोलिसांच्या एकंदरीत कामगिरीचा आढावा घेणारा अहवाल पोलीस आयुक्तालयाने आज प्रसिद्ध केला. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे एकाच वेळी वसई आणि विरार मधील दोन्ही परिमंडळांत या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करून आयुक्तांनी संवाद साधला. पोलीस आयुक्त डॉ. दाते यांनी सांगितले की, आयुक्तालयात भरोसा सेल, दहशतवादविरोधी कक्ष, सदोष मनुष्यवध शाखा, अमली पदार्थविरोधी शाखा, बेपत्ता मुले आणि महिला शोध कक्ष, अनैतिक मानवी वाहतूक शाखा आदी विविध शाखा स्थापन करून गुन्हय़ांची उकल करत आहोत. शिवाय कायदा आणि सुव्यवस्थादेखील अबाधित राखली आहे. एकीकडे गंभीर गुन्हय़ांचे प्रमाण वाढत असताना पोलिसांनी योग्य तपास केल्याने गुन्हय़ांचे उकल होण्याचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत 8 टक्क्यांनी वाढले आहे.
25 कोटींचा मुद्देमाल परत केला
खुनासह जबरी चोरी ( 100 टक्के), खून (90 टक्के) दरोडा (100 टक्के), जबरी चोरी ( 68 टक्के), सोनसाखळी चोरी (66 टक्के) वाहनचोरी ( 33 टक्के), दिवसा घरफोडी (61 टक्के), इतर जबरी चोरी ( 69 टक्के) एवढे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत जबरी चोरीची उकल 5 टक्क्यांनी, सोनसाखळी चोरीची उकल 11 टक्क्यांनी , घरफोडी 16 टक्क्यांनी तर वाहनचोरी 8 टक्क्यांनी वाढली आहे. 2021 या वर्षांत सर्व गुन्हय़ांत मिळून 25 कोटी 34 लाख 21 हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. पोलिसांनी तपास करून त्यातील 11 कोटी 74 लाख 73 हजारांचा म्हणजेच 46 टक्के मुद्देमाल परत मिळवला असल्याची माहिती डॉ. सदानंद दाते यांनी अहवालात दिली आहे.
2021 2022
- खून 38 52
- खुनाचा प्रयत्न 38 35
- दरोडा 05 08
- घरफोडी 388 533
- एकूण चोरी 1243 1777
- वाहन चोरी 658 869



























































