खूनाचा प्रयत्न केलेल्या वॉन्टेड सराईताला बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणात तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला समर्थ पोलिसांच्या पथकाने कोंढव्यातील राहत्या घरातून अटक केली. पोलिसांना पाहताच आरोपीने गॅलरीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला ताब्यात घेतले.

उमरअली गफार शेख (20, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या गुन्ह्यात यापुर्वी समर्थ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मात्र, उमरअली हा फरार होता. समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाना पेठ येथे उमरअली आणि त्याच्या दोन साथीदारांनी एकावर कुऱ्हाडीने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी दोघांना तात्काळ अटक करण्यात आली होती. मात्र, उमरअली हा पोलिसांना चकवा देत होता. फरार कालावधीत तो हैदराबाद येथे वास्तव्यास होता. तेथून पुण्यात आल्यानंतर तो जूना राहण्याचा पत्ता बदलून कोंढव्यात राहण्यासाठी गेला होता. पोलिसांनी शिताफीने तपास करून त्याला कोंढव्यातील घरातून ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.