पुण्यातील व्यापार्‍याच्या अपहरणप्रकरणी मुख्य आरोपीला राजस्थानातून अटक, प्रेमप्रकरणातून अपहरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मांजरी येथील व्यापार्‍याच्या दुकानामध्ये ग्राहक म्हणून आलेल्या तिघांनी व्यापार्‍याला जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून त्याचे अपहरण केल्याप्रकरणात हडपसर पोलिसांनी मुख्य आरोपीला राजस्थानातून अटक केली. प्रेमप्रकरणाच्या संशयावरून हे अपहरण झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अपहरणनाट्यानंतर सर्व आरोपी राजस्थानात पळून गेले होते. हडपसर पोलिसांच्या पथकाने एकाला अटक केली असून उर्वरीत आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

कैलासराम सोहनलाल जाट (35, रा. पाली, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. 23 नोव्हेंबर रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास मांजरी येथून व्यापार्‍याचे अपहरण करण्यात आले होते. संबंधीत व्यापारी हा मूळ राजस्थानातील रहीवासी असून मांजरी भागात त्याचे गिफ्ट अर्टिकलची दुकाने आहेत. बुधवारी (दि.23) रात्री ते दुकानामध्ये असताना तिघांनी ग्राहक म्हणून दुकानात प्रवेश केला. यानंतर त्यांना ओढत रस्त्यावर आणले. सहा जणांनी व्यापार्‍याला जबरदस्तीने गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले. काही तासानंतर अपहरणकर्त्यांनी व्यापार्‍याला मुंबईतील वसई नाका येथे सोडले. यानंतर आरोपी पसार झाले होते.

व्यापारी पुण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौफेर चौकशी केली. तसेच, तांत्रिक तपासावरून माहिती घेतली असता हे अपहरण जाट आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे समोर आले. ते सर्व राजस्थानातील असल्याने पोलिसांनी आठ दिवस शोधमोहीम राबवत जाट याला राजस्थानातून अटक केली. जाट याच्या नातेवाईकातील मुलीबरोबर व्यापार्‍याचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून त्याने साथीदारासह मिळून हे अपहरण केल्याचे कबूल केले. पोलिसांनी जाट याला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरिंवद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

अपहरणनाट्यानंतर आरोपी राजस्थानात पळून गेले होते. त्यांच्या मागावर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. तपासानंतर मुख्य आरोपी जाट याला अटक केली असून त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
– अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे