चिमुरड्याला जाळून टाकण्याची दिली होती धमकी, आठ दिवसांपुर्वी झालेल्या खूनाची उकल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक वादावादीमुळे तीन महिन्याच्या मुलाला जाळून टाकण्याची धमकी मित्राने दिली होती. त्याच रागातून नशेच्या भरात असलेल्या मित्राच्या डोक्यात दगड मारून खून करीत काटा काढणार्‍याला युनीट एकने अटक केली आहे. ही घटना आठ दिवसांपुर्वी बोपदेव घाटात घडली होती. दरम्यान, घटनेचा कोणताही पुरावा नसतानाही, गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय चलाखीने तपास करून आरोपीला बेड्या घातल्या आहेत.

किरण भागवत थोरात (वय 26 रा. राजीव गांधीनगर बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. धनंजय गायकवाड असे खून झालेल्याचे नाव आहे. आठ दिवसांपुर्वी बोपदेव घाटात तरूणाच्या डोक्यात दगड मारून खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह युनीट एककडून तपास करण्यात येत होता. त्यावेळी पोलीस अंमलदार अजय थोरात यांना खूनी आरोपी चिंचवडीमधील डांगे चौकात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने किरण थोरात याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खूनाच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी गजानन टोम्पे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, एपीआय आशिष कवठेकर, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, अजय थोरात,अमोल पवार, इम्रान शेख, राहुल मखरे, विठ्ठल सांळुखे, निलेश साबळे यांनी केली.

म्हणून केला खून

आरोपी किरणने धनंजयकडून काही रक्कम घेतली होती. ती रक्कम पुन्हा माघारी देण्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. त्यामुळे धनंजय किरणला ठार मारण्याची धमकी देत होता. 12 डिसेंबरला धनजंय दारु पिउन किरणच्या घरी गेला. त्याने किरणसह आईला शिवीगाळ केली. त्यानंतर किरणने त्याला पैसे देतो, दारु पाजतो असे म्हणुन बोपदेव घाटात नेले. दारुच्या नशेत धनंजयने किरणला आणि त्याच्या तीन महिन्याच्या मुलाला जिवंत जाळण्याची धमकी दिली. त्याच रागातून धनंजयच्या डोक्यात दगड मारून खून केल्याची कबुली किरणने दिली.