कराडमध्ये खोटी माहिती देणाऱ्या कोरोनाबाधितांवर होणार गुन्हे दाखल – मुख्याधिकारी रमाकांत डाके यांचा निर्णय

कोरोनाबाधित झालेल्यांकडून कराड नगरपालिकेच्या यंत्रणेस दिली जाणारी माहिती चुकीची निघत आहे. त्यामुळे यंत्रणेचा वेळ व बळही वाया जात आहे. बाधिताची टेस्ट केल्यानंतर जो पत्ता देतो, तो कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंगमध्ये चुकीचा निघत आहे. बहुतांश बाधितांकडून दिली जाणारी माहिती खोटी असल्याने मूळ काम सोडून शोधशोध करण्यात नगरपालिकेचा वेळ वाया जात आहे. ते टाळण्यासाठी खोटी माहिती देणाऱ्या कोरोनाबाधितांवर कराड नगरपालिका प्रशासनाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कोरोना रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलणारी कराड नगरपालिका ही जिल्ह्यातील पहिली नगरपालिका आहे.

कराड शहरात कोरोनामुक्तीसाठी नगरपालिकेने कंबर कसली आहे. अत्यावश्‍यक घरपोच सेवा, सॅनिटायझरचे काम सुरू आहे. लसीकरणालाही शिस्त लावली आहे. कोरोनाबाधितांच्या कॉन्टॅक्‍ट ट्रसिंगमध्येही नगरपालिका पुढे आहे. कोरोना बाधितांकडून दिली जाणारी माहिती खोटी असल्याचे आढळून येत आहे. दरम्यान बाधितांनी दिलेली माहिती कॉन्टॅक्‍ट ट्रसिंगमध्ये चुकीची ठरते आहे. रुग्ण असतो ग्रामीण भागातील व पत्ता देतात कराड शहरातील, अशी स्थिती स्पष्ट होत आहे.

ट्रेसिंगमध्ये माहिती खोटी निघाल्याने प्रशासकीय यंत्रणेवरील ताण वाढतो आहे व अनावश्यक काम करावे लागत आहे. रोज किमान दहा लोकांची माहिती खोटी असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे कॉन्टॅक्‍ट ट्रसिंगच्या पथकाचे वेळ व श्रमही वाया जात आहे. खोटी माहिती देणाऱ्या कोरोनाबाधितावर गुन्हा दाखल करण्याचा उपाय आता नगरपालिका प्रशासनाने शोधला आहे.

खासगी व सरकारी अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकच बाधित कोरोनाची टेस्ट करतो. प्रत्येक ठिकाणी पत्ता किंवा मोबाईल नंबर चुकीचा देतो. यामुळे कोरोना बाधितांची साखळी स्थगित करायला अडथळा निर्माण होत आहे. यासाठी नगरपालिका प्रशासन गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयाप्रत आली आहे.

खोटी माहिती देणाऱ्यांवर गुन्हा दाखल 

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी व कोरोनाबाधितांचे कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग व्यवस्थित व्हावे, यासाठी नगरपालिका प्रयत्न करत आहे. मात्र, काही बाधित खोटी माहिती देत आहेत. त्यामुळे प्रशासनाचा वेळ व श्रम वाया जात असून खोटी माहिती देणाऱ्यांवर नाईलाजास्तव गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे.

– रमकांत डाके, मुख्याधिकारी, कराड

आपली प्रतिक्रिया द्या