
शिरूर तालुक्याच्या बहुसंख्य भागात पावसाने पाठ फिरवली असून जून महिना संपत आला, तरी वरुणराजाची कृपा होत नसल्याने खरीपात पेरणी केलेली बाजरी, मूग व इतर पिके वाया जातील की काय ? या विवंचनेत शेतकरी आहेत. जर पाऊस लवकर पडला नाही तर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार असल्याची शक्यता कवठे येमाईच्या पोकळदरा वस्तीतील संदीप सुभाष पळसकर या तरुण शेतक-याने व्यक्त केली आहे.
तालुक्यात साधारण जूनच्या मध्यास पावसास बऱ्यापैकी सुरुवात होते. शेतकरी त्यापूर्वीच खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करून पेरणीयोग्य शेत करून ठेवतात. जूनच्या सुरुवातीला तालुक्यात झालेल्या पावसावर अनेक गावांतील शेतकऱ्यांनी बाजरी, मूग, हुलगा, मटकी व इतर पिकांची पेरणी केली. यंदा कोरोनाची दाहकता, खते, बियाणांचे वाढलेले बाजारभाव, डिझेल दरवाढीने पेरणी यंत्रणांचेही दर वाढलेले आहेत. अशा प्रकारे चोहोबाजूने संकट आलेले असून पावसानेही पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच संकटात सापडला असल्याचे चित्र शिरूरच्या विविध गावांत पाहावयास मिळत आहे.
अनेक शेतकरी पीक कर्जे घेऊन शेती विकसित करतात. मोठा पाऊस अद्याप तर नाहीच, पण पेरलेल्या पिकांना तग धरण्यासाठी अत्यावश्यक असलेला पाऊसही पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लवकरच पाऊस पडला नाही, तर खरीपात पेरणी केलेली पिके वाया जाणार असून यामुळे त्या पिकांसाठी केलेला खर्चही पाण्यात जाणार असल्याने शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. यासाठी शेतकरी समाधानकारक पाऊस पडावा यासाठी वरुणराजाची वाट पाहात आहेत, असे शेतकरी सोमनाथ भाईक यांनी सांगितले.



























































