शिंदे-फडणवीसांच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे महाराष्ट्र अनाथ! काँग्रेसची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारला 15 दिवस झाले तरी अजून मंत्रिमंडळच अस्तित्वात आलेले नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची दुचाकीच काम पाहत आहे. यामुळे राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातलेले असताना पुरात अडकलेल्या लोकांना तसेच शेतकऱयांना आवश्यक ती मदत मिळू शकलेली नाही. शिंदे-फडणवीसांच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे महाराष्ट्र अनाथ झालाय, अशी टीका कॉँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वदूर पाऊस सुरू आहे. नद्या दुथडी भरून वाहत असल्याने आलेल्या पुराच्या वेळी जनतेला तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे; पण मुख्यमंत्री क@मेरा, अॅक्शनमध्ये अडकून व्हिडीओजीवी झाल्याचे दिसत आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात 100 वर लोकांचे मृत्यू झालेत. लाखो हेक्टर शेती पाण्याखाली वाहून गेली आहे. अशा परिस्थितीत सरकार मात्र बेपत्ता असल्याची टीका अतुल लोंढे यांनी केली.

 पंधरा दिवस झाले तरी सरकार जागेवर नाही – जयंत पाटील

महाराष्ट्रातील जनतेसमोर निसर्गाने संकट उभे करून मोठे प्रश्न निर्माण केले आहेत; मात्र अजूनही सरकार जाग्यावर आलेले नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेऊन पंधरा दिवस झाले, आणि गुवाहाटीतील पंधरा दिवस असा महिना उलटला. कुणाला किती खाती आणि कुणाचे किती मंत्री घ्यायचे याच्यातच यांचा वेळ जात आहे. आता वेळ न घालवता कामाला सुरुवात करून लोकांना दिलासा द्या, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

भाजपचे निर्णय पुढे रेटण्याचे काम

महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द करून भाजपचे निर्णय पुढे रेटण्याचे काम राज्य सरकारकडून सुरू आहे. राज्यातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळय़ाचे प्रश्न हाताळण्याऐवजी मुंबईकरांच्या जिवावर बेतणाऱया आरे कारशेडचा निर्णय घेतला. सरपंच, नगराध्यक्ष यांची थेट निवडीचा निर्णय घेतला असल्याचे कॉँग्रेस प्रवक्ते म्हणाले.