पेनल्टी शूटआऊटच्या थरारात क्रोएशियाची बाजी

सामना ऑनलाईन । सोची

फिफा वर्ल्ड कपच्या चौथ्या आणि अखेरच्या उपांत्यपूर्व लढतीत क्रोएशियाने पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या खेळात यजमान रशियावर ४-३ गोल फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. आता बुधवारी त्यांच्यापुढे बलाढ्य इंग्लंडचे आव्हान असेल. तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर क्रोएशियाने वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत धडक दिली. याआधी त्यांनी १९९८ च्या वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरी गाठली होती.

सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांनी १-१ गोल केला होता. ३१ व्या मिनिटाला डेनिस चेरिशेवने रशियाला आघाडी मिळवून दिली, मात्र त्यांची ही आघाडी फार काळ टिकली नाही. लगेचच ८ मिनिटांनी (३९ व्या मिनिटाला) आंद्रेज कॅमरिचने गोल करून क्रोएशियाला १-१ बरोबरी साधून दिली. मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी निर्णायक आघाडी घेण्यासाठी अनेक वेळा एकमेकांवर कुरघोडी केली, मात्र निर्धारित वेळेतही १-१ गोलची कोंडी फुटू शकली नाही.

त्यामुळे अतिरिक्त ३० मिनिटांचा कालावधी देण्यात आला. यात १०१ व्या मिनिटाला ल्युका मॉड्रीचने कॉर्नरवरून दिलेला चेंडू पेनल्टी क्षेत्रात उभ्या असलेल्या रशियन खेळाडूंमधून जागा बनवत मोठ्या कौशल्याने गोलजाळीकडे नेला. व्हेद्रान कोरल्युकाने चेंडू हेडरद्वारे गोलजाळीत सुपूर्द केला आणि क्रोएशियाला २-१ असे आघाडीवर नेले. आता अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्या सत्रात क्रोएशियाला फक्त बचाव करायचा होता. मात्र सामन्यातील नाट्य अजून संपले नव्हते. ११५व्या मिनिटाला पेनल्टी बॉक्सवरून मिळालेल्या फ्री किककर मारियो फर्नांडिसने गोल करून रशियाला २-२ अशी बरोबरी साधून देत सामन्यात पुन्हा एकदा प्राण फुंकले. पुनरागमन करणाऱ्या या गोलवर सोची स्टेडियममधील उपस्थित रशियाच्या चाहत्यांनी एकच जल्लोष करत मैदान डोक्यावर घेतले. अतिरिक्त वेळेत ही बरोबरी कायम राहिल्याने सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाचा गोलरक्षक सुबासिचने रशियाचा पहिलाच प्रयत्न अडकला. त्यानंतर रशियाचा गोलरक्षक ऑकिनफीव्हनेही क्रोएशियाचा प्रयत्न अपयशी ठरवून जोरदार प्रत्युत्तर दिले. पेनल्टी शूटआउटच्या ४ शॉटस्पर्यंतदेखील दोन्ही संघ ३-३ असे बरोबरीतच होते, मात्र पाचव्या आणि अंतिम किकवर रशियाच्या गोलकीपरला गोल वाचवता आला नाही. मार्सेलो बोजोविकने निर्णायक गोल डागत सामना क्रोएशियाच्या झोळीत टाकला.

आकडेवारी                  रशिया            क्रोएशिया
गोल                           ३                     ४
कॉर्नर्स                        ६                     ८
ऑफसाइड                   १                     ०
बॉल ताबा                    ३८                    ६२
पासेस                        ३९९                  ७५३
यलो कार्ड                     १                    ४