स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील 300 मगरींना हटवले, पर्यावरणप्रेमी संतापले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गांधीनगर

गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. 182 मीटर उंचीचे भव्य असे सरदार पटेलांचे स्मारक आहे. ते बघण्यासाठी देशविदेशातील पर्यटक मोठी गर्दी करीत आहेत. त्यांच्या सोयीसाठी सागरी विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आसपासच्या परिसरातील 300 मगरींना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. याविरोधात पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सरदार सरोवराच्या किनाऱ्यावर स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळा आहे. सरोवराच्या परिसरातील मगरींना पिंजऱ्यात पकडून ट्रकने दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येत आहे. वन अधिकारी अनुराधा साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन मीटरपेक्षा जास्त लांबीच्या मगरींना हलवण्यात आले आहे. आतापर्यंत एक डझनापेक्षा जास्त मगरींचे स्थलांतर झाले आहे.

सरकारने मगरींना हलवण्याचा निर्णय घेतल्याने वन्यजीवप्रेमींनी टीका केली आहे. आपण सामूहिकरित्या मेंदू गहाण ठेवलाय का, अशी टीका वन्यजीव मासिकाचे संपादक बिट्टू सहगल यांनी केली. तर या निणर्याचे शास्त्रीय विश्लेषण करायला हवे होते, अशी प्रतिक्रिया वन्यजीव मंडळाचे सदस्य प्रियाव्रत गढवी यांनी दिली.

पर्यटकांसाठी सी प्लेन सुविधा
स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यांच्या सोयीसाठी सी प्लेन सुरू करण्यात येणार आहे. लोह आणि तांब्यापासून तयार झालेला सरदार वल्लभभाई यांचा हा पुतळा भूकंपरोधक आहे. 6.5 तीव्रतेचा भूकंप सहन करू शकतो.