
ऊसतोडणी मुकादमाने केलेल्या लाखो रुपयांच्या फसवणुकीच्या गुह्यात संशयित आरोपीस जेरबंद करण्यास गेलेल्या कोरेगाव पोलिसांच्या पथकावर हिंगोली जिह्यातील ब्राह्मणवाडा तांडा (ता. औंढा नागनाथ) येथे दगडफेकीची घटना घडली. पोलीस आल्याचा आरडाओरडा संशयित मुकादमानेच करीत कुटुंबातील सदस्यांना पथकावर हल्ला करावयास लावला. या हल्ल्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंचळी (ता. कोरेगाव) येथील शेतकरी व ऊसतोडणी वाहतूक ठेकेदार युवराज कदम यांची विनोद नागोराव राठोड नावाच्या मुकादमाने ऊसतोडणी कामगार देतो म्हणून लाखो रुपयांची उचल घेतली होती. मात्र, कामगार पुरवले नव्हते. याप्रकरणी कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात 6 मार्च 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याच्या तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत यांच्यासह सातारा रोड पोलीस दूरक्षेत्रातील अंमलदार सोनमळे व लावंड हे खासगी वाहनाने औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा तांडा येथे संशयित विनोद नागोराव राठोड याच्या शोधार्थ गेले होते. स्थानिक पोलीस ठाण्याने एक कर्मचारी त्यांच्यासमवेत दिला होता.
बुधवारी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास हे पथक ब्राह्मणवाडा तांडा येथे गेल्यानंतर राठोड याने ‘मला पकडायला पोलीस आले आहेत’, अशी बतावणी करीत कुटुंबातील सदस्यांना चिथावणी दिली आणि थेट पोलीस पथकावरच त्यांनी हल्ला केला. यावेळी खासगी वाहनावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये वाहनाची मागच्या बाजूची काच फुटली असून, या गोंधळात विनोद राठोड पसार झाला. उपनिरीक्षक राऊत यांनी यासंदर्भात माहिती दिल्यानंतर तत्काळ हिंगोली पोलिसांनी सूत्रे हलवली. औंढा नागनाथचे पोलीस निरीक्षक विश्वास झुंजारे यांनी तातडीने कोरेगावच्या पथकास मदत केली.
या हल्ल्यात उपनिरीक्षक राऊत हे जखमी झाले आहेत. उपनिरीक्षक राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात विनोद नागोराव राठोड याच्यासह लखाबाई विनोद राठोड, नागोराव राठोड, बायजाबाई नागोराव राठोड, संतोष सुरेश राठोड, शामला संतोष राठोड यांच्यासह अनोळखी 15 ते 20 जणांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, दंगल घडविणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































