मनाली, शिमला, हरिद्वारमध्ये एन्जॉय करणाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी दिला ‘डोस’, म्हणाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसताच आणि सरकारने नियमांमध्ये सूट देताच नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील थंड हवेच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे. मात्र या दरम्यान नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. शिमला, मसूरी, नैनितालमध्ये लोकांनी गर्दी केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना परिस्थितीबाबत एक आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी गर्दी करणाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत त्यांना डोस दिला. थंड हवेचे ठिकाण, मार्केट या ठिकाणी मास्क न घालता आणि नियमांचे पालन न करता गर्दी करणे चिंतेचे कारण आहे. तिसरी लाट येण्याआधी आम्हाला एन्जॉय करू द्या असा तर्क काही लोक मांडत आहेत. परंतु तिसरी लाट काही आपोआप येणार नाही हे लोकांनी समजून घेतले पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

कोरोना अशी महामारी आहे जी आपोआप येत नाही. कोणी जाऊन घेऊन येण्यासारखी ही महामारी नाही. त्यामुळे आपण सावध रहायला हवे आणि तिसरी लाट रोखली पाहिजे. ही लाट आली तर ती रोखणे अशक्य होऊन जाईल. त्यामुळे नियमांचे पालन करा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

बहुरुपी कोरोना

कोरोना रुप बदलत असून तो बहुरुपीया आहे. त्याच्या प्रत्येक व्हेरिएंटवर नजर ठेवण्याची आवश्यकता असून यामुळे आपल्यापुढील आव्हान वाढत आहे. अनेकदा लोक विचारतात की कोरोनाची तिसऱ्या तिसऱ्या लाटेबाबत सरकारची काय तयारी आहे? परंतु तिसरी लाट कशी रोखावी? हा खरा प्रश्न असायला हवा, असेही मोदी म्हणाले.

मसूरीतील व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, मसूरीमध्ये धबधब्याखाली लोक एन्जॉय करत असून याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत लोकांची प्रचंड गर्दी दिसत आहे. अविनाश शरण (@AwanishSharan) या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

पर्यटनाला आलेल्या लोकांना काठी घेऊन मास्क घालण्यास मजबूर करणाऱ्या चिमुकल्याचाही व्हिडीओ व्हायरल