
एखादी महिला माहेरच्यांशी बोलताना फोनवर रडली म्हणून ती हुंडाबळी असल्याचे सिद्ध होत नाही, असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले. पती आणि त्याच्या कुटुंबीयांना हुंडय़ाची मागणी केल्याच्या आरोपातून मुक्त करण्याच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
या प्रकरणात सासरच्यांकडून अपमानास्पद आणि क्रूरतेची वागणूक मिळाल्याचा कोणताही पुरावा नाही. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण निमोनिया सांगण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित महिलेचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आहे. हे लक्षात घेता कलम 498 ए अंतर्गत या प्रकरणात तिला सासरच्यांकडून क्रूरपणे वागणूक देण्यात आल्याचे दिसत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. मृत महिलेच्या बहिणीने न्यायालयात सांगितले की, होळीच्या दिवशी बहिणीने फोन केला होता त्यावेळी ती रडत होती, परंतु न्यायालयाने हा पुरावा फेटाळला.
काय आहे संपूर्ण प्रकरण…
मृत महिलेचे लग्न डिसेंबर 2010 मध्ये झाले होते. तिने दोन मुलींना जन्म दिला. त्यानंतर महिलेचा 31 मार्च 2014 मध्ये मृत्यू झाला. या महिलेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की तिच्या लग्नात 4 लाख खर्च केले होते. त्यानंतर तिचा पती आणि सासरच्यांनी मोटरसायकल आणि रोकड तसेच सोन्याच्या बांगडय़ांची मागणी केली, मात्र सत्र न्यायालयाने महिलेच्या मृत्यूचे कारण निमोनिया असल्याने आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.