प्रसिद्धीसाठी काहीही, पोस्टरबाजी करत चेन्नईच्या समर्थकांचा मुंबई इंडियन्समध्ये प्रवेश

सामना प्रतिनिधी । धाराशिव

आजकाल लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यातले एक माध्यम म्हणजे चौकात भले मोठे पोस्टर्स (फ्लेक्स) लावणे. असेच एक पोस्टर्स धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लावण्यात आले आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यामध्ये चेन्नईला पराभूत करून मुंबई चौथ्यांदा चॅम्पियन झाली. याचाच प्रसिद्धीसाठी फायदा घेत तीन ‘पोस्टर बॉईज’ तरुणांनी युवा ग्रुप धाराशिवच्या माध्यमातून मुंबई इंडियन्समध्ये जाहीर प्रवेश केल्याचे पोस्टर्स लावले आहेत. याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

मुंबईने अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत चेन्नईवर अवघ्या एका धावेने थरारक विजय मिळवला. यानंतर सोशल मीडियावर चेन्नई आणि मुंबई या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये द्वंद्व सुरू झाले. तसेच मुंबईच्या विजयाचा प्रसिद्धीसाठी वापर करून धाराशिवमध्ये आकाश मसने, आकाश जाधव, अमित उपासे या तिघांनी मुंबई इंडियन्समध्ये प्रवेश करत असल्याचे पोस्टर लावले. हे तिघे पूर्वी चेन्नई सुपर किंग्ज या संघाचे कट्टर समर्थक असल्याचे या फ्लेक्सवरती लिहिले आहे.