
गोव्यात वाढतं कोविड संकट पाहता राज्य सरकराने कर्फ्यूत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने 12 जुलै रोजी सकाळी 7 वाजता संपणारा राज्यव्यापी कर्फ्यू आता 19 जुलै रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत वाढवला आहे. यावेळी 50 टक्के उपस्थितीसह जिम उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय क्रीडा संकुलात प्रेक्षकांशिवाय क्रीडा उपक्रम करता येणार असून धार्मिक स्थळे 15 जणांच्या उपस्थितीत उघडता येणार आहेत. याशिवाय पूर्वी परवानगी देण्यात आलेली दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरु असणार आहेत. सायंकाळी 7 नंतर सकाळी 7 वाजे पर्यंत कर्फ्यू लागू असणार आहे.
राज्यात हळूहळू पर्यटक येऊ लागले आहेत. पाच आणि चार तारांकीत हॉटेल्समध्ये पर्यटक उतरण पसंत करत असून कर्फ्यू लागू होण्या पूर्वी पर्यटक पर्यटन स्थळावर फिरताना दिसू लागले आहेत. सरकारने अधिकृत पणे पर्यटन उद्योग सुरु झाल्याची घोषणा केलेली नाही. आरटीपीसीआर चाचणी केलेल्या कोणालाही गोव्यात येता येत आहे. सरकारने जुलै अखेर पर्यंत राज्यातील सर्व लोकांना कोविडच्या लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. त्यानंतर पर्यटन उद्योग सुरु करायचा की नाही यावर विचार होईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय कार्यक्रम वाढू लागले असून त्यात होणाऱ्या गर्दीकडे दुर्लक्ष होत असून ही गर्दी संकटाला निमंत्रण देणारी ठरेल, अशी भीती लोकांकडून व्यक्त होऊ लागली आहे. गोव्यात आज कोविड मधून 241 जण बरे झाले. 19 जणांना रुग्णालायातून डिस्चार्ज देण्यात आला. 131 नवीन रुग्ण सापडल्याने एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 848 झाली आहे. दिवसभरात 2 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण कोविड बळीचा आकडा 3 हजार 97 झाला आहे.




























































