सायनाईड घेतलेल्या विद्यार्थ्याला वाचवण्यात सायन हॉस्पीटलच्या डॉक्टरांना यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या काळात नोकरीची संधी हातून निसटल्याच्या वैषम्यातून एका 23 वर्षीय एमबीए करणाऱ्य़ा विद्यार्थ्याने सायनाईड या विषारी द्रव्याचे सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. काही सेकंदातच उलट्यांचा त्रास सुरू होऊन या रूग्णाची स्थिती खालावली. अखेर या विद्यार्थ्याचा जीव वाचवण्यात सायन हॉस्पीटलच्या डॉक्टरांना यश आले आहे. थेट हैदराबाद येथून औषध मागवून उपचार करण्यात आले. तब्बल 24 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर या विद्यार्थ्याचा जीव वाचला आहे.

कोरोनामुळे आरोग्य समस्यांबरोबरच आर्थिक नियोजन बेरोजगाराची समस्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे तरूणांची मानसिकताही खराब होत असून या ताणतणावाला सामोरे जाताना तरूण आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

रविवार 1 नोव्हेंबरला मनीष (बदललेले नाव) या विद्यार्थ्यांने सायनाईड हे विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. झवेरी बाजारातील एका सराफाकडून सायनाईड मिळवल्याचे उघड झाले आहे.या मनीषला तत्काळ सायन रूग्णालयात दाखल करण्यात आले. सायनाईड हे विषारी द्रव्य सेवन केल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. अत्यंत महत्त्वपूर्ण ट्रीटमेंटचा अवलंब करून या रुग्णाला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले.

सायनाईड विषबाधेसाठी आवश्यक असणारी औषधे महाराष्ट्रात उपलब्ध नसल्याने थेट हैदराबाद येथून मागवण्यात आली. या दरम्यान रूग्णाची स्थिती खालावत जात होती. यावेळी डॉ नितीन कर्णिक आणि डॉ. तृप्ती त्रिदेव या डॉक्टरांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न करून रुग्णावर उपचार केले.

वीस वर्षात तीन रूग्णांवर उपचार; एकाला जीवनदान

सामान्य रुग्णासांठी असलेल्या महापालिकेच्या सायन रूग्णालयात वर्षाला 300 हून अधिक विषबाधा झालेल्या रूग्णांवर उपचार केले जातात. मात्र सायनाईड सारख्या विषारी द्रव्याचे सेवन करणाऱ्य़ा रूग्णांना वाचवणे ही केवळ अशक्यप्राय बाब आहे. गेल्या 20 वर्षाच्या कालावधीत सायनाईड सेवन केलेले 3 रूग्ण सायन हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत. यापैकी एका रूग्णाला वाचवण्यात यश आले आहे.

काय आहे सायनाईड

सफरचंदाच्या बियांपासून तयार होणारे सायनाईड हे विषारी द्रव्य अत्यंत घातक आहे. पोटॅशिअम सायनाईड म्हणून हे ओळखले जाते. याच्या थोड्या मात्रानेही काही सेवंâदातच मृत्यू ओढावू शकतो. हे विषारी द्रव्य सेवन केलेल्या रूग्णाच्या ऑक्सीजन लेवल, हृदय, मेंदु, तसेच फुफ्फुसांवर तत्काळ परिणाम होतो. यात अवयव काही कालावधीतच बंद पडण्यास सुरूवात होते. सेवनानंतर लगेच उलटी सारखा त्रास सुरू होऊन ब्रेन डेड पेशंट्स सारखी रुग्णाची अवस्था होते.

सायनाईड किट्सची कमतरता

सायनाईड हे विषारी द्रव्य सेवन केल्यानंतर वापरण्यात येणाऱ्य़ा अ‍ॅण्टीडॉट्स किटची वैधता केवळ एक वर्षासाठी असते. शिवाय या एका किटची किंमत ही २८ हजार रूपये इतकी आहे. यामुळे या किट्सचा साठा करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने असेच विषारी द्रव्य सेवन केले होते. या विद्यार्थ्याला वाचवण्यात अपयश आले तरिही हा विद्यार्थी शिकत असलेल्या संस्थेने सायन हॉस्पिटलमध्ये एका किटची व्यवस्था केली होती. मात्र आता त्या किटची वैधता संपल्याने हैदराबाद येथून औषधे मागवावी लागली.