एमआयडीसीच्या सर्व्हरवर परदेशातून सायबर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी)च्या सर्व्हरवर झालेला सायबर हल्ला सोव्हिएत युनियनमधील एका देशातून झाल्याची माहिती पुढे येत आहे. रशिया किंवा कझाकिस्तान यापैकी एका देशातून एमआयडीसीचा सर्व्हर हॅक करण्यात आल्याचा अंदाज आहे. सायबर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. 

21 मार्चच्या पहाटे अडीचच्या सुमारास एमआयडीसीच्या संगणकीय प्रणालीवर सायबर हल्ला करण्यात आला. रॅनसम मालवेअरद्वारे हा हल्ला करण्यात आला.  या सायबर हल्ल्यामुळे महामंडळाच्या मुख्यालयाबरोबरच 16 कार्यालयांतील यंत्रणा पूर्णपणे बंद पडली. हा हल्ला करणाऱयाने एक मेल करून खंडणीचीदेखील मागणी केली. एमआयडीसीच्या सर्व प्रणाली ईएसडीएस (क्लाऊड सेवा देणारी कंपनी) आणि महामंडळांतर्गत स्थानिक सर्व्हरवर आहेत. एमआयडीसीच्या मुख्यालयात होस्ट केलेल्या लोकल सर्व्हरवर सायनॅक या रॅनसमवेअरच्या माध्यमातून प्रवेश करून महामंडळाचा सर्व डेटा एक्रिप्ट केला गेला आहे.

यामुळे सर्व्हर सिस्टम व डेटाआधारित सेवा बंद पडल्याने कर्मचारी तसेच ग्राहकांना या माहितीचा वापर करता आला नसल्याचे एमआयडीसीने प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले होते. एमआयडीसीने केलेल्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी  माहिती-तंत्रज्ञान कायदा, 2008 कलम 43 (अ) (फ) व 66 अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदविला. तांत्रिक बाबी तपासल्यानंतर हा हल्ला सोव्हिएत युनियनमधून करण्यात आल्याचे दिसत असल्याचे गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.