सायबर चोरांचा सुळसुळाट, अशी घ्या काळजी!

533
cyber-crime
प्रातिनिधीक फोटो

>> सुरज सामंत । मुंबई

देशातील बेरोजगारी वाढली की आपोआप गुन्हेगारी वाढते आणि बदलत्या तंत्रज्ञानामुळे गुन्हे करण्याच्या पद्धतीतही लक्षणीय बदल होतो. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा स्वतःला या तंत्रज्ञानाशी अवगत व्हावे लागेल व योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

सर्वसामान्यपणे ज्यांची फसवणूक होते ते सामाजिक लज्जेखातर आपली फसवणूक झाली हे लपवून ठेवतात व त्यातूनच असल्या गुन्हेगारांचे फावते. त्यामुळे अशाबाबतीत पहिलं पाऊल म्हणजे त्याची तक्रार करणे व लोकांना सांगून सावध करणे.

अशाच अनेक अनुभवांतून समजलेली काही उदाहरणे आपल्यासमोर आणली आहेत. प्रामुख्याने व्यावसायिकांना आलेले हे अनुभव आहेत, परंतु त्यामुळे असे समजण्याची गरज नाही की इतर नागरिक त्यांच्यापासून सुरक्षित आहेत.

1. दुपारची वेळ (अ) दुकानात दैनंदिन व्यवहार करत असतात आणि त्यांना फोन येतो. फोन करणारा व्यक्ती आपण सैन्यात नोकरीला असल्याचे कळवतो व आपले ओळखपत्रदेखील व्हॉटस्ऍपवर पाठवतो. घाऊक खरेदी करायची सांगून घासाघीस करून किंमत ठरवली जाते. अचानक आलेली विक्रीची संधी व ग्राहकाचे संभाषण चातुर्य यामध्ये व्यावसायिक भुलून जातो व तेव्हा ग्राहक (ब) ‘अ’ला गुगल पेद्वारे पैसे पाठवायची तयारी दाखवतो. पैसे मिळाल्यावर माल पाठवा असं ठरतं. ‘ब’ तेव्हा ‘अ’ला आपण पाठवलेल्या लिंकवर क्लिक करायला सांगतो. त्यांच्या खात्यात पैसे स्वीकारण्यासाठी नमुना खातर 5000/- पाठवण्याचे ठरते. लिंक मिळते. अ क्लिक करतो व ‘अ’च्या खात्यातून 5000/- वळते होतात. फोनवर संभाषण चालूच असल्याने संभ्रमित ‘अ’ याबाबतीत ‘ब’ला तक्रार करतो. ‘ब’ अचंबित होऊन ‘अ’ला पैसे मिळाल्याचे कळवतो व ते परत पाठवण्याची तयारी दाखवतो आणि पुन्हा लिंक पाठवतो जी क्लिक केल्यावर पुन्हा 5000/- वळते होतात. आता ‘अ’ थोडा चिडतो त्यावर. काहीतरी गलफत असल्याचे सांगून नमुना खातर 1 रुपया पाठवतो. ते मिळाल्यावर आपल्याला मिळालेले 10,000/- पुन्हा पाठवतो असे सांगून ‘अ’ला विचारतो की, आपल्या खात्यात किती रुपये आहेत? आता ‘अ’ सावध होतो व लिंकला क्लिक करत नाही. पुढे ‘ब’चा फोन बंद. ‘अ’ पोलिसांकडे व बँकमध्ये तक्रार करतो 10,000/-चे नुकसान झाल्यावर.

2. दुकानदाराला फोन येतो त्यांच्या गुगल मॅपवरील माहिती संदर्भात व कळवले जाते की, आपणास गुगलवर आपली माहिती ठेवायची असेल तर OTP पाठवा. यामध्ये कुठलेही बँक खाते अथवा क्रेडिटकार्डसंबंधी माहिती देणे आवश्यक नसते. त्यामुळे निर्धास्त होऊन दुकानदार येणारा पासवर्ड शेअर करतो. काही दिवसांनी गिऱहाईक दुकानात येऊन तक्रार करतात, पैसे ऑनलाइन पाठवूनदेखील वस्तू घरपोच न मिळाल्याची. तेव्हा निदर्शनास येते की, गुगलवर त्या दुकानाचे संपर्क क्रमांक बदलले होते. जेव्हा गिऱहाईकांनी त्या क्रमांकावर चौकशी केली तेव्हा त्यांना बँक खाते क्रमांक दिला गेला ज्यावर पैसे भरले गेले निवडलेल्या वस्तूच्या मोबदल्यात. दुकानदाराला ज्याची माहितीदेखील नसते.

3. दुकानात दोन ग्राहक येतात व महागडा मोबाईल व टीव्ही खरेदी करतात. त्याचे पैसे मोबाईलवरून ऑनलाइन भरतो असे सांगून दुकानदाराला त्यांच्या खात्याची माहिती मेसेज करायला सांगतात. थोडय़ा वेळाने दुकानदाराला त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येतो. परंतु थोडय़ा वेळाने लक्षात येते की, बँक खात्यात पैसे जमा झालेलेच नसतात व तो मेसेजदेखील हुबेहुब बँकेच्या मेसेजसारखा, परंतु फसवा मेसेज असतो.

4. दुकानात गिऱहाईक येतो व वस्तू निवडतो. आपले दुकान बाजूलाच असून ती वस्तू तिथे पाठवण्यास सांगतो व पैसे तिथेच दिले जातील असे कळवतो. दुकानदार आपल्या कामगाराकडे वस्तू सांगितलेल्या पत्त्यावर पाठवतो. तिथे ती व्यक्ती दिसते व बाहेर येऊन आपल्या गाडीत ठेवायला सांगून व जाऊन दुकानातून पैसे घेण्यास सांगते. कामगार दुकानात गेल्यावर कळते की ती व्यक्ती गिऱहाईक बनून त्या दुकानात चौकशी करता आली होती व त्याव्यतिरिक्त काहीच माहिती नसते. व्यक्ती फरार.

असे विविध अनुभव लोकांना आले असून त्यांनी त्याची तक्रार पोलिसांत करावी व इतरांना दक्ष करावे.

आपली प्रतिक्रिया द्या