दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. एस. हायस्कूलचा उपक्रम , पाच दिवस ऑफलाइन; पाच दिवस ऑनलाइन परीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शीव येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास शिबीर आयोजित केले असून याद्वारे पाच दिवस ऑफलाइन तर पाच दिवस ऑनलाइन वर्गातून विद्यार्थ्यांकडून एकूण 36 प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करून घेतला जाणार आहे.

धारावी, शीव, चुनाभट्टी येथील कष्टकरी घरांतील विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळावेत यासाठी शाळेच्या संस्थापकांनी 10 दिवसीय निवासी अभ्यास शिबीर घेण्यास सुरुवात केली होती. गेली 62 वर्षे आम्ही हे अभ्यास शिबीर घेत आहोत. या अभ्यास शिबिरात आम्ही विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवून घेतो, अशी माहिती डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्याने आम्ही 3 ते 7 जानेवारी शाळेत आणि 8 ते 12 जानेवारी घरी-ऑनलाइन अशा पद्धतीने अभ्यास शिबिराचे नियोजन केले होते, अशी माहितीही प्रधान यांनी दिली.

कोरोनामुळे यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येता आले नाही. त्यांचा लिखाणाचा सराव सुटला आहे. म्हणूनच आम्ही दहावीच्या 235 विद्यार्थ्यांकडून दररोज 4 प्रश्नपत्रिका सोडवून घेत आहोत. सराव प्रश्नपत्रिकांमुळे त्यांचा लिखाणाचा वेग वाढत आहे, अशी माहिती शाळेच्या उपमुख्याध्यापिका शुभांगी गायकवाड यांनी दिली.