सराव परीक्षेवर असणार पालकांसह मोबाईल कॅमेऱ्याची नजर, शीवच्या डी. एस. हायस्कूलचा उपक्रम

exam
प्रातिनिधिक फोटो

कोरोनामुळे संपूर्ण वर्षभर दहावीचे विद्यार्थी घरात बसून ऑनलाइन अभ्यास करत आहेत. शाळेतील वर्गात बसून दररोजच्या लिखाणाचा त्यांचा सरावच झालेला नाही. त्यामुळे ऐन परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडवताना त्यांचा लिखाण वेग कमी असू नये, ही दक्षता घेत शीव येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने विशेष उपक्रम राबवला आहे. 8 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यानच्या 20 दिवसीय ‘ऑनलाइन अभ्यास शिबिरा’त दहावीच्या विद्यार्थ्यांकडून दररोज दोन प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यावर भर देण्यात येत आहे.

धारावी, शीव, प्रतीक्षानगर परिसरातील कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांचा दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल उत्तम लागावा, यासाठी डी. एस. हायस्पूलमध्ये गेली सलग 61 वर्षे 10 दिवसीय ‘निवासी अभ्यास शिबिरा’चे आयोजन केले जात आहे, पण यंदा कोरोनामुळे प्रथमच हे अभ्यास शिबीर ऑनलाइन पद्धतीने घेण्याची वेळ शाळेवर आली आहे.

ऑनलाइन शिबिरात मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रीनमुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर ताण निर्माण होऊ नये, म्हणून 10 दिवसांचा अभ्यास शिबिराचा उपक्रम 20 दिवसीय ऑनलाइन अभ्यास शिबिराद्वारे पूर्ण करत आहोत, अशी माहिती डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली. या सराव परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या मनातील बोर्डाच्या परीक्षेची भीती कमी होऊन त्यांचा आत्मविश्वासही दुणावत आहे, असेही प्रधान म्हणाले.

‘सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत आम्ही दोन प्रश्नपत्रिका सोडवून घेतो. प्रत्येक प्रश्नपत्रिकेच्या आधी 40 मिनिटांचे उजळणी सत्र असते. या उपक्रमासाठी ‘गुगल क्लासरूम’चा वापर केला जातो. अनेकदा पालक सुपरवायझरची (पर्यवेक्षक) भूमिका पार पाडतात. प्रश्नपत्रिका सोडवून झाली की विद्यार्थी पीडीएफ स्वरूपात ती अपलोड करतात’ अशी माहिती डी. एस. हायस्पूलच्या शिक्षिका वंदना म्हात्रे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या