
पारावरच्या रंगभूमीपासून व्यवसायिक रंगभूमी पर्यंत रंगभूषाकार आणि नेपथ्यकार म्हणून प्रवास केलेले रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी गणपत उर्फ दादा लोगडे यांचे गुरूवारी रात्री दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते 69 वर्षांचे होते. 16 व्या राज्यनाट्य स्पर्धेपासून 59व्या राज्यनाट्य स्पर्धेपर्यंत ते रंगभूमीवर कार्यरत होते. त्यांनी रंगभूमीवर काम करायला सुरूवात केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि दोन मुली असा परिवार आहे.
दादा लोगडे हे शिवसैनिक होते. त्यांनी बसणी गावचे सरपंचपद भूषविले.सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग होता. मुंबईत स्कूल ऑफ़ आर्ट मध्ये शिक्षण घेतल्यानंतर दादा लोगडे यांनी व्यवसायिक नाटकात बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरूवात केली. भाऊ रांगणेकर, बाबा पार्सेकर, कृष्णा जन्नूरकर यांच्या सारख्या दिग्गज कलाकारांकडून नेपथ्यकला आणि कृष्णा बोरकरांकडून रंगभूषा त्यांनी आत्मसात केली. मुंबईत सोबत तव प्रितीची, कुटुंब, खोली पाहिजे, अमृत नव्हे विष, गारंबीचा बापू, नेक जात मराठा, आधे आधुरे, शिवकंकण, सीमेवरून परत या नाटकांमध्ये दादा लोगडे यांनी नेपथ्य आणि रंगभूषा साकारली.
मुंबईतून पुन्हा रत्नागिरीत परतल्यानंतर त्यांनी हौशी रंगभूमीवर काम केले. राज्य नाट्य स्पर्धा,कामगार कल्याण स्पर्धा, संगीत नाटक, एकांकिका स्पर्धांना दादा लोगडे नेपथ्यकार आणि रंगभूषाकार म्हणून काम करत होते. त्यांच्या व्यवसायिक रंगभूमीवरच्या ज्ञान आणि अनुभवाचा फायदा ते रत्नागिरीकरांना करून देत असतं. राज्य नाट्य स्पर्धेत पाच वेळा त्यांनी नेपथ्याचे प्रथम पारितोषिक पटकावले होते.
नाट्यसंपदा मुंबई आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद यांच्या वतीने बाबा वर्दम स्मृती गौरव कै. बाबूलनाथ कुरतडकर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव झाला होता. आचरेकर प्रतिष्ठाननेही त्यांना विशेष पुरस्कार देऊन गौरव केला होता. गुरूवारी रंगभूमी दिनीच ज्येष्ठ रंगकर्मी दादा लोगडे यांचे निधन झाल्याने रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.
35 हून अधिक राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग
16 व्या राज्य नाट्य स्पर्धेपासून गतवर्षीच्या 59व्या राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत दादा लोगडे यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्यांना रंगभूमीचा प्रदीर्घ अनुभव होता.वयाची पासष्ठी ओलांडल्यानंतरही ते स्पर्धेत रंगभूषा आणि नेपथ्य करत होते. दिल्लीत होणाऱ्या संगीत नाटकांतही त्यांचा सहभाग असायचा. कोकणातील उत्सवाच्या नाटकात ते हक्काचे रंगभूषाकार आणि नेपथ्यकार होते.

























































