पर्यावरण योद्धा! घरोघरी जाऊन गोळा करतेय प्लॅस्टिक, दादरच्या विद्या बारस्कर-गोकर्णकर यांचा स्त्युत्य उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर येथे राहणाऱया विद्या बारस्कर-गोकर्णकर यांनी गेल्या वर्षी घरोघरी जाऊन प्लॅस्टिक गोळा करायला सुरुवात केली. वैयक्तिक पातळीवर सुरू झालेल्या उपक्रमाने हळूहळू अभियानाचे रूप घेतले. विद्या यांनी बिट्स अॅण्ड बाईट्स फेसबुक पेजची निर्मिती करून प्लॅस्टिक संकलन मोहिमेला आणखी बळकटी दिली. लोकांमध्ये जागृती करत त्यांनी पर्यावरण बचावाचे कार्य सुरू ठेवले आहे. त्याचे फलित म्हणजे आज 25 सोसायटय़ा त्यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत. या सोसायटय़ांमधून त्या नियमित प्लॅस्टिक गोळा करत आहेत आणि एनजीओंना रिसायकलिंगसाठी देत आहेत.

विद्या बारस्कर-गोकर्णकर यांनी गेल्या वर्षीपासून प्लॅस्टिक गोळा करण्याच्या कामाला सुरुवात केली. पुढे या कामाचे रूपांतर कम्युनिटी ड्राईव्हमध्ये झाले. मागच्या गणेशोत्सवात विद्या यांनी तब्बल 100 किलो प्लॅस्टिक गोळा केले. गणेश मंडपात पडलेल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या त्यांनी जमवल्या. स्वतःहून त्यांनी काही सोसायटय़ांशी संपर्क साधला. 14 नवरात्री मंडळ त्यांच्याशी जोडले गेले. या मंडळातून त्यांनी नवरात्रीत 180 किलो प्लॅस्टिक गोळा केले. यामध्ये केवळ पाण्याच्या बाटल्या नव्हत्या, तर फूड कंटेनर, टेट्रा पॅक, बिस्कीट-चॉकलेटचे रॅपर, तेलाचे पॅन, मसाल्याची पाकिटे, पॉलिबॅग, जाडय़ा-बारीक पिशव्या यांचा समावेश होता. याशिवाय या सोसायटय़ांमध्ये महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम केले. सत्पात्री दान हा उपक्रम राबवला. नवरात्रीनंतर प्लॅस्टिक संकलन उपक्रमाने जोर पकडला.

नवरात्रीनंतर कित्येक महिलांनी विद्या यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर प्रत्येक आठवडय़ाला प्लॅस्टिक संकलन मोहीम जोराने सुरू झाली. अनेक ठिकाणांहून त्यांना पह्न आले. दादर, माटुंगा, गिरगाव, वडाळा-भक्ती पार्क येथील सोसायटय़ांमधून त्यांनी प्लॅस्टिक गोळा करायला सुरुवात केली. गिरगावातून त्यांनी सुमारे साडेतीनशे किलो प्लॅस्टिक जमवले.

आज जनजागृती रॅली

विद्या बारस्कर दोन संस्थांसोबत काम करतात. या संस्था प्लॅस्टिक रिसायकलिंगचे काम करतात. त्यांच्याशी लोकांना ‘कनेक्ट’ करण्याचे काम विद्या करतात. संस्थांच्या मदतीने सोसायटय़ांमध्ये जाऊन पर्यावरणविषयक जागृती करतात. बिट्स अँड बाईट्सच्या वतीने रविवार, 5 जून रोजी दादरच्या कबुतरखाना येथून दुपारी 4 च्या सुमारास इको रॅली आणि इको वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱयांना ‘इको वॉरिअर’ने सन्मानित केले जाईल.

आज जागतिक पर्यावरण दिन

  • निसर्गाची काळजी घ्या आणि भविष्य सुरक्षित करा, हा संदेश देणारे अनोख वाळूशिल्प हिंदुजा हॉस्पिटलच्या वतीने साकारण्यात आले.
  • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पनवेल येथील वाधवा वॉईस सिटी येथे विश्वविक्रमी आर्टिस्ट चेतन राऊत यांनी 4 हजार रोपांपासून जगातील सर्वात मोठे मोजेक पोर्ट्रेट साकारले.