रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीत अमूल्य योगदान असलेले ज्येष्ठ अभिनेते शिवाजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत यांचा सर्वोच्च ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. विज्ञान भवनात 67वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या दिमाखदार सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी, धनुष यांच्यासह मराठीतील ‘बार्डो’, ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटांनाही गौरविण्यात आले.

या सोहळ्यात मनोज वाजपेयी आणि धनुषला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर कंगना रानावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सहाय्यक कलाकाराचा पुरस्कार पल्लवी जोशी आणि विजय सेतुपती यांना तर सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार ‘छिछोरे’ला देण्यात आला. ‘बार्डो’मधील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सावनी रवींद्रला गौरविण्यात आले. ‘बार्डो’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला.  दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी ‘रजतकमळ’ स्वीकारले.

गुरू, भाऊ आणि बस ड्रायव्हर सहकाऱयांचे आभार

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना रजनीकांत म्हणाले, या क्षणी मला काही लोकांचे आभार मानायचे आहेत ज्यांनी मला या संपूर्ण प्रवासात कायम साथ दिली. हा सर्वोच्च सन्मान मी गुरू के. बालाचंदर यांना समर्पित करत आहे. माझे भाऊ सत्यनारायण गायकवाड हे मला माझ्या वडिलांसारखे आहेत. त्यांनी मला उत्तम संस्कार आणि अध्यात्म्याची शिकवण दिली. माझा मित्र, एकेकाळचा ड्रायव्हर सहकारी राज बहादूर याचेही आभार.

माझा आनंद गगनात मावत नाहीय. मी हा पुरस्कार माझ्या दोन महिन्यांच्या मुलीला समर्पित करते. ती माझ्यासाठी लकी चार्म आहे. अर्थातच माझ्या सर्व गुरुजनांचे आशीर्वाद, माझ्या आई-वडिलांचे कष्ट आणि कुटुंबीय यांचा यात मोठा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आजवर यश संपादन करू शकले. जेव्हा मी गाणं गायलं होतं त्या वेळी माझं लग्नही झालं नव्हतं. परंतु आज मी एका आईच्या भूमिकेत आहे आणि आज त्या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी मी माझ्या दोन महिन्यांच्या मुलीला घेऊन दिल्लीला आली आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप स्पेशल आहे.
– गायिका सावनी रवींद्र