घरफोडी करणारी टोळी गजाआड , तुरुंगातून बाहेर येताच घरफोड्या सुरू केल्या

रात्रीच्या वेळेस घरफोडी करणाऱ्या टोळीला दहिसर पोलिसांनी गजाआड केले आहे. रमजान शौकतअली शेख, आयुब सरबर अली अन्सारी, अविनाश कांबळे, अनिल अमित मनोहर जाधव, युसूफ सुलेमान शेख, रिजवान अहमद पंकाली अशी त्या सहा जणांची नावे आहेत. ते सहाही जण न्यायालयीन कोठडीत आहेत.

दहिसरच्या परबत नगर मैदान परिसरात काही जण मोबाईलच्या दुकानात घरफो़डी करण्यासाठी येणार असल्याची माहिती दहिसर पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर सहायक पोलीस निरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे, गायकवाड, परब, तटकरे, शिरसाट, सांगळे यांच्या पथकाने सापळा रचला. पहाटेच्या सुमारास दोन रिक्षातून आलेल्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या टोळीकडून पोलिसांनी चाकू, सुरा, कटावणी, मिरचीपूड, नायलॉनची दोरी, पाच मोबाईल जप्त केले.

आयुब आणि रमजान हे दोघे मुख्यसूत्रधार असून ते दोघे काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आले होते. तुरुंगातून बाहेर येताच त्या दोघांनी पुन्हा घरफोड्या करण्यास सुरुवात केली. आयुब आणि रमजान हे दोघे दुकान फोडण्याचे काम करतात. तर अविनाश आणि युसूफ हे दोघे रिक्षा चालक असून अनिल आणि रिजवान हे दोघे रेकी करण्याचे काम करतात. तपासादरम्यान पोलिसांनी आयुब आणि रिजवानची कसून चौकशी केली. चौकशीमध्ये त्याने दरोडा टाकण्यासाठी रतननगर येथून रिक्षा चोरल्याची पोलिसांना कबुली दिली. पोलिसांनी चोरीच्या दोन रिक्षा जप्त केल्या आहेत. रमजानवर 6, आयुबवर 12, अविनाशवर 2 गुन्हे दाखल असल्याचे दहिसर पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या