
बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून एकच सदनिका तिघांना विकणाऱ्या एजंटला अखेर दहिसर पोलिसांनी अटक केली. अजय पांडे असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दहिसर पूर्व परिसरात तक्रारदार राहतात. त्याच्या वडिलांचे तेथे घर होते. तेथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत त्यांना सदनिका देण्यात आली. त्याचदरम्यान तक्रारदार याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर तक्रारदार हे गावी गेले. गेल्या वर्षी तक्रारदार हे मुंबईत आले. तेव्हा त्यांचे घर दुसऱ्या व्यक्तीला दिल्याचे उघड झाले. फसवणूक केल्याप्रकरणी तक्रारदार याने दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक जिनपाल वाघमारे यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी काही जणांचे जबाब नोंदवले. तेव्हा पांडेचे नाव समोर आले. पोलिसांनी सापळा रचून पांडेला अटक केली.


























































