
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा भाविकांविना झाली. पालखी सोहळा वाहनातून संपन्न झाला. पण यावेळी पालखी सोहळा 21 मानकऱयांच्या उपस्थितीत करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. दि. 26 एप्रिल रोजी श्री जोतिबाची चैत्र यात्रा आहे. पण यंदाही ही यात्रा भाविकांविनाच होणार आहे.
गेल्यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्वच मंदिरे बंद करण्यात आली होती. गावागावांतील सर्वच लहान-मोठय़ा जत्रा-यात्राही रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानुसार श्री जोतिबाची ही चैत्र यात्रा रद्द करण्यात आली होती. सासनकाठय़ा आणि मिरवणुकांनाही परवानगी नाकारली होती. मानाचा पालखी सोहळा सजवलेल्या वाहनातून यमाई मंदिराकडे साजरा करण्यात आला.
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सलग दुसऱया वर्षी ही यात्रा रद्द करू नये, यासाठी आमदार विनय कोरे यांनी जोतिबा डोंगरावरील काही ग्रामस्थांसह शुक्रवारी (दि. 23) दुपारी महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन चर्चा केली. बैठकीत श्री जोतिबाची चैत्र यात्रा पारंपरिक पद्धतीने केवळ 21 मानकऱयांच्या उपस्थितीत करण्यावर भर देण्यात आला. यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव विजय पवार आदी उपस्थित होते. जिल्हा प्रशासन तसेच देवस्थान समितीकडून याबाबत रात्री उशिरापर्यंत अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.

































































