माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला, शोएब अख्तरचा ‘यू टर्न’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदू असल्याने दानिश कनेरियासोबत भेदभाव केला जायचा असे वादग्रस्त विधान करून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने खळबळ उडवून दिली होती. या विधानानंतर पाकिस्तान आणि हिंदुस्थानमधील माजी खेळाडूंमध्ये ट्वीटवॉर सुरू झाले. आता शोएब अख्तर याने याबाबत स्पष्टीकरण देत ‘यू टर्न’ घेतला आहे. दानिश कनेरियाबाबत दिलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचा शोएब म्हणाला. धार्मिक आधारावर कोणत्याही खेळाडूसोबत भेदभाव करण्याची पाकिस्तानी संघाची परंपरा नसल्याचे तो म्हणाला.

दानिश कनेरिया हा हिंदू क्रिकेटपटू पाकिस्तानी संघामधून अनेक वर्षे खेळला. त्याने स्वबळावर पाकिस्तानला विजय मिळवून दिल्यानंतरही संघ सहकाऱ्याकडून त्याला चांगली वागणूक मिळत नव्हती. त्याच्यासोबत जेवणावरही आक्षेप असायचा, असा गौप्यस्फोट माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने गुरुवारी केला होता. शोएब अख्तर याच्या या विधानाचे पडसाद पाकिस्तानमध्येही उमटले. माजी कर्णधार इंझमान उल-हक याने माझ्या संघात असा भेदभाव कधीही नव्हता हे स्पष्ट केले. विशेष म्हणजे दानिश कनेरिया इंझमान उल-हक हा कर्णधार असताना सर्वाधिक क्रिकेट खेळला आहे.

पाकिस्तानमधून वाढता विरोध पाहता शोएब अख्तर याने ‘यू टर्न’ घेतला आहे. माझ्या विधानावर मोठी आदळ-आपट होत आहे. माझ्या विधानाचा पूर्णपणे चुकीचा अर्थ काढण्यात आला असे शोएब अख्तर म्हणाला. यू-ट्यूब चॅनेलवर बोलताना शोएब म्हणाला की, संघातील एक-दोन खेळाडूंनी दानिश कनेरियासोबत भेदभाव करणारी कमेंट केली, मात्र संघातील इतर खेळाडूंनी याला पाठिंबा दिला नाही आणि अशा खेळाडूंसोबत कठोर निर्णय घेण्यात आल्याचेही शोएब म्हणाला.

पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला – गौतम गंभीर

शोएब पुढे म्हणाला की, आमच्या संघातील एक अलिखित नियम होता की पाकिस्तानकडून खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा सन्मान करायचा. परंतु काही खेळाडूंच्या मनाच चलबिचल होती. परंतु ही आमच्या संघाची परंपरा नाही. संघात फक्त एक-दोन खेळाडू होते जे अशी कमेंट करायची असेही तो म्हणाला. तसेच अशा प्रकरणांना हवा देण्यात येऊ नये असेही तो म्हणाला.

दरम्यान, शोएब अख्तर यांने गुरुवारी केलेल्या विधानानंतर दानिशने त्याला या दलदलीतून बाहेर काढा, अशी मागणी केली आहे. दानिशने त्याच्या आयुष्यात खूप अडचणी असून कुणीतरी मला मदत करा अशी याचनाच केली आहे. त्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना देखील मदत करा असे आवाहन केले आहे.

मला या दलदलीतून बाहेर काढा, दिनेश कानेरियाची मागणी