दशावतार म्हणजे कोकणच्या मातीचा उत्स्फूर्त आविष्कार. कोकणी माणसाचा सांस्पृतिक ठेवा. हा ठेवा जपण्याचे काम दशावतारी कलाकार इमानेइतबारे करत आहेत. या मांदियाळीत आदराचे नाव घेतले जाते जे ओमप्रकाश चव्हाण यांचे. त्यांनी साकारलेल्या स्त्री पात्रांच्या सौंदर्याने अन् गोड गळ्याने अनेकांना भुरळ घातली आहे. दशावतारात सर्वाधिक मानधन आणि एंट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट, शिट्टय़ांचा पाऊस घेणारी एकमेव व्यक्ती म्हणजे चव्हाण. प्रेक्षक आणि समीक्षकांनी त्यांना दशावतरातले बालगंधर्व ही पदवी बहाल केलीय. त्यांचा कलाविष्कार अनुभवण्याची संधी रविवारी जगभरातील प्रेक्षकांना मिळणार आहे.
इंडिया कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन (आयसीसीआर) या संस्थेतर्फे कलाविश्व 2021 ही नवी मालिका सुरू होत आहे. या मालिकेत 18 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजता दशावतार कला सादर होईल. ओमप्रकाश चव्हाण दशावतराचा आविष्कार सादर करतील. कलाविश्वच्या माध्यमातून कोरोना काळात ग्रामीण भागातील कलावंतांना व्यासपीठ मिळणार आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक परफॉर्मिंग आर्टचा प्रसार करणे तसेच विदेशी विद्यार्थ्यांना या संस्पृतीचे दर्शन घडवणे, हा कलाविश्वचा उद्देश आहे. कलाविश्वचे उद्घाटन आयसीसीआरचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या होईल. हा कार्यक्रम फेसबुक लाइव्ह स्वरूपात प्रेक्षकांना बघता येईल.
कोरोना काळात कलाविश्व मालिकेचे व्हर्च्युअल आयोजन होणार आहे. आयसीसीआरच्या प्रादेशिक सल्लागार समितीचे विनोद पवार या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत. आयसीसीआर ही स्वायत्त संस्था परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अख्त्यारित 1950 साली स्थापन झाली आहे.
































































