राफेल प्रकरणी ‘दसॉल्ट एव्हिएशन’च्या सीईओंचा मोठा दावा, राहुल गांधींचे आरोप फेटाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

फ्रान्सकडून घेण्यात येणाऱ्या 36 ‘राफेल’ लढाऊ विमाने खरेदीप्रकरण वेगवेगळी वळणं घेत आहे. एकीकडे काँग्रेसकडून घोटाळ्याचे आरोप सुरू आहेत, भाजप आणि रिलायन्सकडून ते नाकारण्यात येत आहेत. पंतप्रधान या प्रकरणी काही बोलत नाही, सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे कराराची माहिती मागवली आहे. अशातच आता दसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी इरिक ट्रॅपिअर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेसोबत बोलताना काँग्रेसचे सारे दावे खोडून काढले आहेत.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना इरिक ट्रॅपिअर म्हणाले की, ‘मी खोटं बोलत नाही. सत्य काय आहे ते मी आधीच स्पष्ट केलं आहे आण मी जी विधानं केली आहेत ती सत्य आहेत. खोटं बोलून मला कोणताही मान मिळणार नाही. मी मुख्य कार्यकारी अधिकारी आहे, या पदावर असताना मी खोटं बोलणं हे माझ्या प्रतिष्ठेला शोभत नाही.’ असे म्हणत त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले दावे खोडून काढले आहे.

अंबानींचे नाव आम्ही निवडले आहे. आमच्याकडे रिलायन्स सोडून आधीपासून 30 अन्य पार्टनर्स आहेत. हिंदुस्थानच्या हवाई दलाने आम्हाला पाठिंबा दिला कारण त्यांना आपल्या संरक्षण यंत्रणेला अग्रक्रमात नेण्यासाठी चांगल्या प्रतीची आधुनिक लढाऊ विमानं हवी आहेत, असेही ते म्हणाले.

किंमतीतही कोणताच घोळ नसल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे. विमानांची संख्या 18 असताना जेवढी किंमत देण्यात आली होती त्याच प्रमाणात संख्या 36 झाल्यानंतर देण्यात आली आहे. खरं तर माझ्या म्हणण्यानुसार ती दुप्पट असली पाहिजे होती. मात्र हा दोन सरकारांमधील करार होता. तिथे काही बोलणी, घासाघिसी झाली. त्यामुळे मला 9 टक्क्यांनी किंमत कमी करावी लागली, असंही त्यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.