
श्री दत्त अवतार श्री स्वामी समर्थांच्या अखंड जयघोषाने अक्कलकोटनगरी आज दत्त जयंतीनिमित्त दुमदुमली. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांमुळे वटवृक्ष मंदिर आणि समाधीमठ परिसर फुलून गेला होता. मंदिर परिसर फुलांनी सजविण्यात आल्याने आनंद, भक्तिभावाची अनुभूती येत होती. दत्त जयंतीनिमित्त शहरात श्री स्वामीसमर्थ आणि दत्तपालखीचेही आगमन झाले आहे.
श्री स्वामीसमर्थ वटवृक्ष मंदिरात पहाटे चार वाजता ज्येष्ठ पुरोहित मोहनराव पुजारी यांच्या अधिपत्याखाली श्रींची काकड आरती, महाभिषेक करण्यात आला. प्रतिवर्षाप्रमाणे पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, मुंबई येथून दिंडी व पालख्यांचे आगमन झाले. भजन, गायन, नामघोषांनी शहर भक्तिमय झाले होते. स्वामींचे दर्शनासाठी अलोट गर्दी झाली होती. मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व विश्वस्तांनी योग्य नियोजन केले होते. सायंकाळी ज्योतिबा मंडपात पुरोहित मंदार पुजारी यांच्या हस्ते पाळण्याचे पूजन आणि प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. मंदिर समितीच्या वतीने भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्ज्वलाताई सरदेशमुख यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते या सोहळय़ाला उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्रीदत्त जयंती उत्साहात संपन्न झाली. अभिनेते अक्षय मुदवाडकर, अतिरिक्त पोलीस महासंचालक मनोजकुमार लोहिया यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांना महानैवेद्य दाखविण्यात आला. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय राजे विजयसिंहराजे भोसले, कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्यासह प्रमुख विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.
दत्त नामाने नृसिंहवाडी दुमदुमली
दत्त जयंती सोहळय़ानिमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी परिसर दत्त नामाने दुमदुमून गेला. ‘दिगंबरा दिगंबरा…’च्या गजरात कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर भक्तिमय वातावरणात श्री दत्त महाराजांच्या राजधानीत आज सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मसोहळा मोठय़ा उत्साहात संपन्न झाला.
दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात पहाटे 3.30 वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी सात ते बारा यावेळेत अनेक भक्तांनी ‘श्रीं’ची पंचामृत अभिषेक पूजा केली. दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा करण्यात आली. दुपारी तीन वाजता येथील ब्रम्हवृंदामार्फत पवमान पंचसूक्त पठन करण्यात आले. साडेचार वाजता श्रींची उत्सवमूर्ती श्री नारायणस्वामी महाराज यांच्या मंदिरातून वाजत गाजत मुख्य मंदिरात आणण्यात आली. ह.भ.प. काने बुवा कवठेगुलंद यांच्या कीर्तनानंतर सायंकाळी पाच वाजता धार्मिक वातावरणात विधिवत श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. जन्मकाळ सोहळ्यासाठी चांदीचा पाळणा विविध रंगांच्या फुलांनी आकर्षक सजविला होता. दत्तदेव संस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी व सचिव गजानन गेंडे पुजारी, सरपंच चेतन गवळी यांनी नियोजन केले.
जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यांतून लाखो भाविक आले होते. कर्नाटक येथील बोरगाव, उगार, चिकोडी तसेच सांगली, मिरज, इचलकरंजी, कोल्हापूर आदी भागातून हजारो भक्त व महिला थंडी असूनही चालत येऊन पहाटेच दत्त मंदिरात पोहोचले होते.
शिर्डीत मंदिर परिसरात फुलांची आरास
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित दत्त जयंती उत्सवामुळे साईबाबा समाधी मंदिर व श्री दत्त मंदिर परिसर आज सकाळपासूनच भक्तिरसाने न्हाऊन निघाले. साईभक्त श्रीमती रजनी डांग यांच्या देणगीतून मंदिरात करण्यात आलेली फुलांची आकर्षक सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती. संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर ह.भ.प. स्नेहल संजय कुलकर्णी (नाशिक) यांचे कीर्तन झाले. त्यानंतर श्री दत्त जन्मोत्सव साजरा झाला. संध्याकाळी 6 वाजता ‘श्रीं’ची धुपारती, त्यानंतर रात्री 9.15 वाजता गावातून मिरवणूक काढण्यात आली.
देवगडमध्ये तोफांच्या सलामीने सोहळा संपन्न
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,’ असा दत्त नामाचा जयघोष, आकर्षक विद्युतरोषणाई, तोफांची सलामी, फटाक्यांची आतषबाजी, लाखो दत्त भाविकांची मांदियाळी, अशा भक्तिमय वातावरणात श्रीक्षेत्र देवगड येथे दत्त जन्माचा सोहळा संपन्न झाला. दत्त जन्मानंतर आमटी भाकरीचा प्रसाद वाटण्यात आला.
भास्करगिरी महाराज, शालिनीताई विखे-पाटील, लीलाबाई मते यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली. यावेळी श्री देवगडचे उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरी महाराज, कैलासगिरी रमेशानंद, पु. भास्करगिरी महाराज यांच्या मातोश्री सरूबाई पाटील, प्रकाशानंद महाराज यांच्या मातोश्री लीलाबाई मते, आमदार विठ्ठल लंघे-पाटील उपस्थित होते.




























































