
तालुक्यातील बेलवडे बुद्रूक येथे बिबट्या मृतावस्थेत आढळल्याची घटना बुधवारी सकाळी समोर आली आहे. हा बिबट्या सुमारे तीन वर्षांचा असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. याबाबतची माहिती वन विभागाला कळविण्यात आली आहे.
बेलवडे बुद्रूक येथील शिवारात बुधवारी सकाळी 10 वाजता उसाच्या शेतात वैरण काढायला गेलेल्या शिवाजी बाळासाहेब पवार या शेतकऱयाला बिबट्या मृतावस्थेत पडला असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबतची माहिती तत्काळ ग्रामस्थांना दिली. त्यानंतर बिबट्याला पाहण्यासाठी शिवारात लोकांची मोठी गर्दी झाली होती. या बिबट्याचा मृत्यू हा दोन-तीन दिवसांपूर्वी झाला असल्याचा प्राथमिक अंदाज असून, परिसरात दुर्गंधी सुटल्याने त्याठिकाणी पाहिले असता शेतकऱयाच्या ही बाब निदर्शनास आली. दरम्यान, याबाबतची माहिती वन विभागाला कळविण्यात आली असून, वन विभागाच्या अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
बेलवडे बुद्रूकसह आसपासच्या गावांमध्ये काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना निदर्शनास आले होते. तसेच काही दिवसांपूर्वीच बेलवडेमध्ये शेतातील वस्तीवर बिबट्याने हल्ला करून कुत्रे फस्त केल्याची घटना घडली होती.
या परिसरात वारंवार बिबट्याचे होणारे हल्ले व ग्रामस्थांना प्रत्यक्ष बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने यावर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बेलवडेसह कासारशिरंबे, मालखेड, कालवडे, कासेगाव, वाठार ग्रामस्थांकडून होत आहे.






























































