वेगवान प्रवासाची ‘नशा’ जिवावर बेततेय! समृद्धी महामार्गावर चार महिन्यांत 55 बळी, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर 10 अपघातांत 11 जणांचा मृत्यू

मुंबई आणि नागपूरला जोडणाऱया हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर वेगवान ड्रायव्हिंगची ‘नशा’ जीवघेण्या अपघातांना निमंत्रण देत आहे. मागील चार महिन्यांत या महामार्गावर 55 जणांचा अपघाती मृत्यू झाला. दुसरीकडे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गेल्या चार महिन्यांत 10 अपघातांत 11 जणांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्र महामार्ग पोलिसांनी समृद्धी महामार्गात आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील प्राणघातक अपघातांची आकडेवारी जाहीर केली आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर दहा प्राणघातक अपघात झाले, त्यात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर 47 अपघातांची नोंद झाली. त्यात 55 जणांना जीव गमवावा लागला. समृद्धी महामार्गाच्या तुलनेत मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर कमी जीवितहानी झाली. इंटेलिजेंट ट्रफिक मॅनेजमेंट सिस्टीममुळे (आयटीएमएस) मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील अपघातांची संख्या कमी झाल्याचा दावा अतिरिक्त वाहतूक आयुक्त भरत कळसकर यांनी केला.

गेल्या वर्षीची आकडेवारी

2024 मध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर एकूण 191 अपघात झाले त्यापैकी 74 प्राणघातक अपघातांमध्ये 90 जणांचा मृत्यू झाला. तसेच समृद्धी एक्स्प्रेसवेवर वर्षभरात 137 अपघात झाले. त्यातील 96 प्राणघातक अपघातांमध्ये 126 जणांचा बळी गेला.

‘आयटीएमएस’मुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघातांचे प्रमाण कमी

‘आयटीएमएस’ प्रणालीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे परिवहन विभागाने म्हटले आहे. ‘आयटीएमएस’अंतर्गत अतिवेगाने वाहन चालवणे, बेकायदेशीर पार्किंगृ, चुकीच्या पद्धतीने प्रवेश करणे, सीटबेल्टशिवाय वाहन चालवणे, गाडी चालवताना मोबाईल पह्नचा वापर करणे, लेन कटिंग करणे यांसारख्या नियम उल्लंघनांवर प्रगत कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाते. समृद्धी महामार्गावरही संबंधित प्रणाली लागू करण्याची परिवहन विभागाची योजना आहे.