शालेय गणवेश : एक वेगळी ओळख

1406
school32

>>दीपक गुंडये<<

जून महिना उजाडताच शाळा सुरू होण्याची चाहूल लागते. उन्हाळी सुट्टी संपत आलेली असते. एका मोठय़ा विश्रांतीनंतर परत शाळेत जायची वेळ आलेली असते. अर्थात उन्हाळी शिबिरे, विविध छंदवर्ग यामुळे ही विश्रांती बऱ्याच मुलांना घेता येत असेल का याबाबत शंकाच आहे. शाळा सुरू होण्यापूर्वीची तयारी म्हणून मग विविध वस्तूंची तयारी सुरू होते. जून महिन्यातच सुरू होणाऱ्या मोसमी पावसाला तोंड देण्यासाठी छत्री किंवा मुख्यत्वे रेनकोट, चपला किंवा शूज घेतले जातात. शैक्षणिक साहित्यात वह्या, पुस्तके, रंगीबेरंगी दप्तरे, पेन, पेन्सिल इत्यादींची खरेदी तर आवश्यकच ठरते. परंतु शाळेत जायचे म्हटल्यानंतर अजून एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे गणवेश. शाळेचा गणवेश अंगावर चढवल्यानंतरच विद्यार्थी ही ओळख मिळते. त्यामुळे गणवेश खरेदी अनिवार्यच ठरते. गणवेश हा शालेय जीवनातील अविभाज्य घटकच मानता येईल.

तसं पाहायला गेलं तर गणवेश मग तो कुठलाही असो तो समूहभावनेचे, शिस्तीचे प्रतीक असतो. गणवेश सगळे भेदभाव मिटवतो. काही गणवेश तर इतके प्रतिष्ठsचे असतात की ते अंगावर चढवण्यासाठी खडतर प्रशिक्षण घ्यावे लागते. अशा गणवेशात शान असते, एक प्रकारचा आब असतो. उदाहरणार्थ सैनिकी गणवेश. पोलीस, अग्निशमन दल, टपाल खाते, महापालिका कर्मचारी, पारिचारिका, हवाईसुंदरी इत्यादींचा गणवेश वेगवेगळा असतो आणि त्या गणवेशावरूनच त्यांच्या पेशाची कल्पना येते. त्यामुळे प्रत्येकाच्या गणवेशाला वेगळेच महत्त्व असते. शालेय जीवनात असलेले गणवेशाचे महत्त्वही हे असेच वर्षानुवर्षे कायम आहे.

पूर्वी शाळांचा गणवेश म्हणजे मुलांसाठी खाकी पॅन्ट व पांढरा शर्ट आणि मुलींसाठी निळा फ्रॉक व पांढरा शर्ट अशा ठरावीक रंगातील असायचा. बहुतेक शाळा, संस्थांचा गणवेश असाच असायचा. महापालिका शाळांचा गणवेश अजूनही तसाच असला तरी कालांतराने मात्र गणवेशाच्या रूपात बदल झाला. रंग बदलत गेले, चौकटीचे, रेघांचे शर्ट आले. इंग्रजी शाळांप्रमाणे मराठी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशावर टाय चढविला गेला. मुलींच्याही निळ्या-पांढऱ्या रंगातील गणवेशांची जागा, फिकट हिरवा, फिकट नारंगी, तपकिरी या रंगांनी घेतली. गणवेशाचं रूप पालटलं गेलं.

पूर्वी गणवेश शिवून घेतले जायचे. पण जसा काळ बदलला तसे गणवेश दुकानात तयार मिळू लागले. हल्ली तर तयार गणवेशच घ्यावे लागतात आणि शाळा सांगतील त्याच दुकानात जाऊन गणवेश खरेदी करण्याची सक्तीही विद्यार्थ्यांवर आली आहे. त्यातच ठरावीक दुकाने असल्यामुळे गणवेशांच्या किमतीही चढय़ा असतात. पर्याय उपलब्ध नसल्याने चढय़ा किमतीतील गणवेश खरेदी करण्यावाचून गत्यंतर उरत नाही. त्याचीही पालकांची तयारी असते. परंतु गणवेश ठरावीक अंतराने वारंवार बदलले जातात तेव्हा मात्र संस्थाचालकांच्या हेतूविषयी शंका उपस्थित होते. गणवेशाच्या माध्यमातून आर्थिक फायद्याचे गणित चालवले जात नसावे कशावरून अशी शंका उपस्थित झाल्यास त्यात वावगे ते काय?

पूर्वी भावंडं एकमेकांचे गणवेश घालायचे. पुढील इयत्तेत गेलेल्या भावंडांच्या इतर शैक्षणिक साहित्याबरोबरच गणवेशाचाही वापर मागचे भावंड करायचे. थोरल्या भावाचा गणवेश धाकटय़ा भावाला हक्काने दिला जायचा. अशी गंमत आता बहुतेक घरात एकच मूल असल्याने हरवली आहे. आणि दोन भावंडं असली तरी गणवेश इतक्या वेगाने बदलले जात आहेत की एका भावंडाने दुसऱ्या भावंडांचा गणवेश वापरायचा ठरवला तरी वापरता येत नाही.

अशावेळी गणवेशातून विद्यार्थ्यांमध्ये समूहभावना निर्माण होण्याचा प्राथमिक उद्देशच हरवला जाण्याची भीती वाटू लागते. वारंवार गणवेश बदलल्यामुळे शाळेची ओळख सांगणारा वेगळा असा गणवेश समोर येत नाही. साहजिकच गणवेशाचे अप्रूप राहत नाही. विद्यार्थ्यांमध्येही गणवेशाबद्दलची आपुलकीची भावना लोप पावण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे शाळेची वैशिष्टय़पूर्ण ओळख दर्शविणारा गणवेश वारंवार बदलला जाऊ नये असे आग्रही मत मांडावे लागतेय!

आपली प्रतिक्रिया द्या