पत्रकारांना पेन्शन, जीआर आठ दिवसांत

2

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

नवीन जाहिरात धोरण, पत्रकार संरक्षण कायदा आदी मागण्यांबरोबरच पत्रकारांना निवृत्तीवेतन लागू करण्यासाठी गेल्या अधिवेशनात शासनाने 15 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा निधी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे वर्ग करण्यात आला असून आठ दिवसांत याबाबत शासन निर्णय काढण्यात येईल असे सांगून आज पालकमंत्री दीपक केसरकर यांनी युती शासन काळातच पत्रकार भवनाच्या निर्मितीसाठी निधी किंवा पत्रकार बांधवांच्या मागण्यांची पूर्तता झाली असल्याचे सांगितले.

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन इमारतीचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. सिंधुदुर्गनगरीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेजारी 11 गुंठे क्षेत्रात या पत्रकार भवनाची उभारणी होत आहे.

साडेचार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारे बाळशास्त्राr जांभेकर स्मारक व पत्रकार भवन राज्यातील पत्रकारांचे प्रेरणास्थान होईल. या पत्रकार भवनात अद्ययावत सभागृह, सिंधुदुर्गनगरीस भेट देणाऱया पत्रकार व पर्यटकांसाठी आठ सूट, व्यापारी गाळे, बाळशास्त्री जांभेकर यांचा पुतळा असे राज्यात आदर्शवत अशा पत्रकार भवनाची उभारणी होईल. कमीत कमी वेळात या पत्रकार भवनाची उभारणी पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केला.