
रेणापूर तालुक्यातील दर्जी बोरगाव, सांगवी, सिंधगाव, शेरा व निवाडा या गावांतील शिवारात हरीण व रानडुक्करांचा वावर वाढला आहे. सध्या सोयाबीन आणि ऊस लागवडीचे क्षेत्र या गावांत जास्त आहे. सोयाबीनचे पीक सध्या कोवळ्या अवस्थेत आहे. त्यामुळे वाढत्या हरणांच्या आणि रानडुकराच्या वावरामुळे सोयाबिन पीक धोक्यात आले आहे. हरीण भरदिवसा सोयाबिनच्या उभ्या पिकांमधून पळतात व रानडुक्कर रात्री मोठ्या प्रमाणात उसाचे नुकसान करतात.
सोयाबीनचे पीक कोवळे असल्यामुळे हरणांच्या पावलाने पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे गोगलगायींच्या संकटातून सावरलेल्या शेतकऱ्याला आता या वन्य प्राण्यांचे संकट सतावत आहे. हरणांचे मोठमोठे कळप दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून पळत असतात. त्यामुळे पिकांच्या रक्षणाकरिता शेतकऱ्यांकडे काहीच पर्याय नसल्यामुळे शेतकरी राजा हतबल आणि निराश झाला आहे.
क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग, अशी अवस्था सध्या या गावांतील शेतकऱ्यांची झाली आहे. या वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी संबंधित विभागाने लक्ष घालून या संकटापासून आमची सुटका करावी, अशी मागणी दर्जी बोरगाव, सांगवी, सिंधगाव, शेरा आणि निवाडा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.


























































