जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

नाशिक जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते, आमदार छगन भुजबळ यांनी दिली.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात जामिनावर सुटका झाल्यानंतर छगन भुजबळ हे गुरुवारी प्रथमच नाशिकमध्ये आले. कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांशी भेट घेण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. गंगापूर धरणावरील बोट क्लब पुन्हा सुरू व्हावे यासह विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. जनतेचे विविध प्रश्न सोडविणार आहोत. उद्या शुक्रवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेऊन त्यांना विविध प्रश्न सोडविण्याच्या सूचना करणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

नाशिक-दिल्ली विमानसेवेला त्यांनी शुभेच्छा दिल्या. सप्तशृंग गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीचा प्रकल्प देशातील पहिला प्रकल्प आहे, त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते व्हावे. त्या कार्यक्रमाला मीही हजर राहीन, असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस नाना महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, गजानन शेलार, माजी आमदार जयवंत जाधव, श्रीराम शेटे, छबू नागरे, बाळासाहेब कर्डक आदी हजर होते.