
एका रात्रीत सोशल मीडियावर लोकप्रिय झालेले ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी बदामी देवी यांच्यावर पुन्हा ढाब्याच्या दारात बसून ग्राहकांची वाट बघण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या लाटेत फेब्रुवारी महिन्यात त्यांचे नवे रेस्टॉरंट बंद पडले. त्यामुळे कांता प्रसाद यांना जुन्या ढाब्यावर परतावे लागलेय. पुन्हा एकदा बाबाच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
दिल्लीतील मालवीय नगर परिसरात रस्त्याच्या कडेला ‘बाबा का ढाबा’ आहे. गेल्या वर्षी सोशल मीडियावरून बाबा कांता प्रसाद यांनी आपली व्यथा सर्वांसमोर मांडली होती. एका यू-टय़ूबरने बाबाचा संघर्ष जगासमोर आणला होता. त्यानंतर देशभरातून कांता प्रसाद यांना मदतीचा ओघ सुरू झाला. त्याचबरोबर त्यांच्या ढाब्याची चमक वाढली. लोक दूरवरून ‘बाबा का ढाबा’ बघायला येऊ लागले. कांता प्रसाद यांच्यासोबत सेल्फी घेऊ लागले. बघता बघता कांता प्रसाद यांना एवढी मदत मिळाली की त्यातून त्यांनी ढाबा सोडून रेस्टॉरंट सुरू केले. मात्र सध्याच्या दिवसात कोरोनाच्या निर्बंधांमुळे त्यांच्या रेस्टॉरंट व्यवसायावर परिणाम झालाय. त्यांच्यावर रेस्टॉरंटला टाळे लावायची वेळ आली. त्यानंतर त्यांनी पुन्हा ढाब्यावर परतण्याचे ठरवले. मात्र तिथेही ग्राहकांची वाट बघावी लागत आहे. सध्याच्या दिवसांत लोकांनी फुटपाथवर खाणे कमी केलेय. त्यामुळे ढाब्यावर फारसे कुणी फिरकत नाही. त्यांचा जेमतेम हजार रुपयांचा धंदाही होत नाही. एवढय़ा तुटपुंज्या कमाईत आठ लोकांचे घर चालवणे त्यांना कठीण जातंय. त्यामुळेच पुन्हा एकदा ग्राहकांची वाट बघणे त्यांच्या नशिबी आलेय.



























































