दिल्ली – बँक्वेट हॉलमध्ये धर्मपरिवर्तनाची अफवा पसरल्याने तणाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीच्या वजिराबाद परिसरात धर्मपरिवर्तन सुरू असल्याची अफवा पसरल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं. येथील एका गावातल्या बँक्वेट हॉलमध्ये हा कार्यक्रम सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनीही तिथे धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

वजिराबाद येथील झरोदा शिवकुंज येथे शुक्रवारी धर्मपरिवर्तन करत असल्याच्या शंकेने तणाव निर्माण झाला होता. परिसरात झुंडीच्या झुंडी जमा होऊ लागल्याने वातावरण गंभीर झालं. काही हिंदू संघटनांना अशी माहिती मिळाली की येथील खान वाटिका या बँक्वेट हॉलमध्ये ख्रिश्चन धर्मीयांकडून हिंदूंचे धर्मपरिवर्तन करण्यात येत आहे. त्या माहितीच्या आधारे काही मिनिटांत बँक्वेट हॉलबाहेर 300 ते 400 लोकांचा जमाव आला. तिथे जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या. या दरम्यान काहींनी पोलिसांनाही ही माहिती दिली.

जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा जवळपास 200 लोक बाहेर आणि 60 जण बँक्वेट हॉलमध्ये जमा झाले होते आणि स्थिती तणावाची झाली होती. पोलिसांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गर्दी हटवली आणि तिथून सहा जणांना ताब्यात घेतलं. प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर अद्याप ती अफवा होती, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. ती खरी आहे किंवा नाही, याची सविस्तर चौकशी करण्यात येत आहे.