Delhi Bomb Blast – मुजम्मिलच्या आणखी दोन ठिकाणांचा पर्दाफाश, फळ व्यवसायाच्या आडून टेरर नेटवर्क

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेला आणखी मोठं यश मिळालं आहे. दहशतवादी मुजम्मिलच्या आणखी दोन ठिकाणांचा त्यांनी पर्दाफाश केला आहे. तो कश्मिरी फळांच्या व्यवसायाच्या आडून स्फोटके जमवत होता. व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूलच्या माध्यमातून 2 हजार 900 किलो स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. तो मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत होता.

तपास यंत्रणांच्या तपासात कळले की, मुजम्मिलचे फरीदाबादच्या खोरी जमालपूर गावात एक घर आहे आणि एक छोटी खोली भाड्याने घेतली होती. काश्मिरी फळे विकण्याचा व्यवसाय सुरू करायचा होता, असे त्याने घरमालकाला सांगितले होते. त्यांना कधीही त्याच्यावर संशय आला नाही कारण मुझम्मिल शांत, सुशिक्षित असल्याचे घरमालक जुम्मा खान म्हणाले. या खोलीत सुमारे 12 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात स्फोटके साठवून ठेवण्यात आली होती.

मुजम्मिल एका जागी जास्त दिवस राहत नव्हता. एप्रिल ते जुलैच्या दरम्यान तो अल फलाह विद्यापिठाजवळ एका फॅक्टरीच्या वर असलेल्या खोलीत राहत होता आणि 8 हजार रुपये महिन्याला भाडे देत होता. तीन महिन्यानंतर घरात खूप गरम होत असल्याचे कारण देत त्याने ते घर बदलले. आता तपास यंत्रणेला संशय आहे की, जागा बदलणे हे तर कारण होते. पण खरे कारण त्याला स्फोटके सारखी वेगळ्या ठिकाणी शिफ्ट करायची होती. तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, मुजम्मिलने शेतकऱ्याच्या जमिनीवर बांधलेल्या खोलीत मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि कच्चा माल साठवला होता. त्यानंतर त्याने या वस्तू फतेहपूर टागा गावातील मौलवी इश्तियाकच्या घरी हलवल्या. या पद्धतीवरून मुजम्मिल एकटाच नाही तर एक संपूर्ण प्रशिक्षित दहशतवादी संघ, “व्हाइट-कॉलर मॉड्यूल” सहभागी होता. हे मॉड्यूल इतके धोकादायक होते की, फरिदाबादमध्ये छाप्यात 2 हजार 900 किलोग्रॅम स्फोटके सापडली, जी मोठ्या हल्ल्यासाठी वापरता येतील इतकी होती.