
छत्तीसगडमधील रायपूर विमानतळावर मंगळवारी मोठा अपघात टळला. रायपूरहून एअर इंडियाचे विमान (क्रमांक एआयसी 469) दिल्लीसाठी उड्डाण करताच, एक पक्षी विमानाला धडकला. ज्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. त्यानंतर लगेच विमान धावपट्टीवर परतले. सर्व प्रवासी सुरक्षितपणे विमानातून उतरले. केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री रेणुका सिंहदेखील या विमानात होत्या.
ही घटना धावपट्टी क्रमांक 24 वर सकाळी साडेदहा वाजता घडली. पायलटने हुशारीने विमान लॅण्ड केले. त्यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यानंतर अभियंत्यांकडून फ्लाइटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाली का, हे तपासण्यात आले.
रायपूर विमानतळाचे संचालक राकेश रंजन सहाय यांनी सांगितले की, एआयसी 469 या विमानाने 179 प्रवाशांसह रायपूरवरून दिल्लीसाठी सकाळी उड्डाण केले होते. त्यानंतर एक पक्षी विमानाला धडकला. त्यानंतर उड्डाण रद्द करण्यात आले. या घटनेनंतर प्रवासी उतरले असल्याचे त्यांनी सांगितले. विमानतळावरील कर्मचाऱ्यांना धावपट्टीच्या तपासणीदरम्यान पक्ष्याच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. एअर इंडियाचे अभियांत्रिकी कर्मचारी आणखी विमानाची तपासणी करत आहेत.
























































