IPL 2020 – दिल्ली कॅपिटल्सच लक्ष्य ‘पाचवा विजय’, राजस्थानला टाळायचाय पराभवाचा चौकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पहिल्या दोन लढतींत दिमाखदार विजय मिळवून आयपीएलची दमदार सुरुवात करणाऱया स्टीवन स्मिथच्या राजस्थान रॉयल्सला पुढील तीन लढतींमध्ये सपाटून मार खावा लागला. आता त्यांना यंदाच्या मोसमात पुनरागमन करायचे आहे. पण आज होणाऱया लढतीत त्यांच्यासमोर जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असणार आहे. श्रेयस अय्यरचा दिल्ली कॅपिटल्सचा संघ यावेळी विजयाच्या हॅटट्रिकसह स्पर्धेतील पाचवा विजय मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल. स्टीवन स्मिथच्या राजस्थान रॉयल्सला मात्र पराभवाचा चौकार टाळायचा असेल. राजस्थान रॉयल्ससाठी एक जमेची बाजू असणार आहे. पहिल्या दोन लढती या संघाने ज्या ठिकाणी जिंकल्या त्याच ठिकाणी उद्याची लढत होणार आहे. शारजाह येथील लहान आकाराच्या स्टेडियममध्ये पुन्हा एकदा चौकार-षटकारांसह धावांचा पाऊस पडणार हे निश्चित आहे.

कॅगिसो रबाडाचे आव्हान
दिल्ली कॅपिटल्सच्या आतापर्यंतच्या उल्लेखनीय कामगिरीत वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा याने सिंहाचा वाटा उचलला आहे. त्याने 12 फलंदाजांना बाद केले आहे. स्टीवन स्मिथच्या ब्रिगेडला या गोलंदाजाचे आव्हान परतवून लावावे लागणार आहे. ऍनरीच नॉर्खिया (7 बळी), अक्षर पटेल (4 बळी), रविचंद्रन अश्विन (3 बळी) व मार्क्स स्टोयनीस (3 बळी) यांची साथही कॅगिसो रबाडाला लाभत आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्ससाठी उद्याचा पेपरही सोप्पा नसेल.

फलंदाज कात टाकताहेत
दिल्ली कॅपिटल्सचे सर्वच खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. पृथ्वी शॉ (179 धावा) शानदार सलामी देत आहे. शिखर धवनला (127 धावा) सूर गवसलेला नसला तरी छोटी पण महत्त्वाची खेळी त्याच्याकडून होत आहे. कर्णधार श्रेयस अय्यरही (181 धावा) जबरदस्त फलंदाजी करतोय. मार्क्स स्टोयनीसने (123 धावा) सामन्याला कलाटणी देणाऱया खेळी या मोसमात केलेल्या आहेत. रिषभ पंतही (171 धावा) चांगली फलंदाजी करतोय. या सर्वांच्या चमकदार कामगिरीमुळे शिखर धवन मोठी खेळी करण्यात अपयशी ठरीत असला तरी त्याची ही कामगिरी झाकोळली जात आहे.

स्मिथ, संजूचे अपयश
राजस्थान रॉयल्सने पहिल्या दोन लढतींत प्रतिस्पर्ध्यांना हरवत चार गुणांची कमाई केली होती. या दोन्ही लढतींमध्ये संजू सॅमसनसह स्टीवन स्मिथ यानेही फलंदाजीत आपला ठसा उमटवला होता. पण त्यानंतरच्या तिन्ही लढतींत दोघेही अपयशी ठरले आणि संघही पराभूत झाला. या उर्वरित लढतींमध्ये या दोघांना फलंदाजीत झोकात पुनरागमन करावे लागणार आहे. शिवाय जोस बटलर, राहुल तेवतीया यांनाही धमक दाखवावी लागणार आहे. उद्याच्या लढतीतही या संघामध्ये बदल होऊ शकतात.

पुन्हा एकदा आर्चरच
बेन स्टोक्स यूएईत दाखल झाला असला तरी तो अजून क्वारंटाइनमध्येच आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत राजस्थान रॉयल्सला आणखी एक लढत खेळावी लागणार आहे. राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी विभागात पुन्हा एकदा मदार असणार आहे ती जोफ्रा आर्चरवर. या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत पाच फलंदाज बाद केले आहेत, पण इतर गोलंदाजांची त्याला साथ लाभलेली नाहीए. श्रेयस गोपाल, टॉम करण, अंकित राजपूत यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून आला. कार्तिक त्यागी या युवा गोलंदाजाकडून मोठय़ा अपेक्षा बाळगल्या जात आहेत.

आजची लढत
राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
रात्री 7.30 वाजता